नवी दिल्ली- लोकसभेत बहुमत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची राज्यसभेतील पकडदेखील मजबूत झाली आहे. भाजपची राज्यसभेतील सदस्यांची संख्या ८६ झाली असून काँग्रेसकडे ४१ जागा आहेत, तर २४५ सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत भाजपप्रणीत 'रालोआ'च्या जवळपास १०० जागा झाल्या आहेत.
नुकतेच निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६१ जागांचे निकाल दिले आहे. यामध्ये मार्च महिन्यात झालेल्या ५५ जागांच्या निकालाचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे हे निकाल देण्यास उशीर झाला. सध्या राज्यसभेत अण्णाद्रमुकचे (९), भारतीय जनता दल (९), वायएसआर काँग्रेस (६) आणि इतर काही लहान पक्षांनी जागा जिंकल्या आहेत. या पक्षांनी भाजपला मदत केल्यास ते राज्यसभेत कोणताही निर्णय अडथळ्याशिवाय घेऊ शकतील.
आधी राज्यसभेत ४२ जागांसाठी बिनविरोध निवडणुका पार पडल्या. तर शुक्रवारी १८ जागांसाठी मतदान पार पडले. गुजरात आणि मध्य प्रदेशात काँग्रेस आमदारांमध्ये फूट पडल्यामुळे भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकता आल्या.
भाजपने एकूण १७ जागा जिंकल्यात. तर काँग्रेस ९, जेडीयु ३, बीजेडी ४, तृणमुल काँग्रेस ४, अण्णाद्रमुक आणि डीएमके प्रत्येकी ३, राष्ट्रवादी २, आरजेडी २, टीआरएस २ आणि इतर जागांवर काही प्रादेशिक पक्षांनी विजय मिळवला.
दरम्यान, या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप राजकीय फायद्यासाठी आमदार फोडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर कलम ३७० रद्द करणे, जम्मू आणि काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करणे यासह नागरिकत्व संशोधन कायदा संमत केल्याप्रकरणी भाजपला इतर पक्षांकडून राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा मिळाला.
निवडून आलेल्या ६१ खासदारांपैकी ४३ जण हे पहिल्यांदाच राज्यसभेवर गेले आहेत. त्यामध्ये भाजपच्या ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेसचे वरीष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश आहे. तर माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि माजी लोकसभा उपसभापती एम थंबी दुराई यांचीही राज्यसभेवर निवड झाली आहे.
राज्यसभेत आधी काँग्रेस खासदारांची संख्या जास्त होती. त्यामुळे भाजपला कोणतेही विधेयक राज्यसभेत मांडताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकसभा आघाडीकडे बहुमत झाले आहे.