पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्याच अनुषंगाने बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एनडीए आघाडीने राज्यात केलेल्या कामांची माहिती देण्यात आली. 'बिहार रिपोर्ट कार्ड'चे अनावरण करण्यात आले.
एनडीएकडून बिहार निवडणुकी आधी रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आले आहे. पाटण्यातील एका हॉटेलात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा, जेडीयू आणि इतर एनडीएतील पक्षांचे नेते सहभागी होते. यावेळी जेडीयू नेते संजय झा म्हणाले की, बिहारमध्ये कायम जातीच्या नावावर मते मागण्यात आली. मात्र, नितीश कुमारांनी निवडणुका बदलल्या. २००५ पासून नितीश कुमारांनी शून्यातून सुरूवात केली. आज बिहारची स्थिती कशी आहे, हे कोणीही लपवू शकत नाही, असे झा म्हणाले
बिहारमध्ये पंतप्रधानांच्या १२ सभा
पंतप्रधान मोदींच्या राज्यात १२ सभा होणार आहेत. २३ ऑक्टोबरपासून या सभा सुरू होणार आहेत. निवडणुकीचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेते ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत एलसीडी स्क्रीन लावून मोदींचे भाषण दाखविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.मोदींच्या सर्व सभा या एनडीएच्या असतील. ज्यात मुख्यमंत्री नितीश कुमारांसह एनडीएतील नेते उपस्थित राहणार आहेत.
बिहारच्या प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर नेटवर्क उभारणार
भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, बिहारच्या प्रत्येक गावात फायबर ऑप्टिकल केबलचे नेटवर्क उभारून इंटरनेट सेवा पोहचविण्यात येईल. ही घोषणा पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केली होती. हे आश्वासन सत्ता आल्यानंतर करणार असल्याचे ते म्हणाले.