महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रवादीला अजून एक धक्का! महिला प्रदेशाध्यक्षपदाचा चित्रा वाघ यांनी दिला राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी काल (गुरुवार) शिवसेनेत प्रवेश केला होता. आता, चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

महिला प्रदेशाध्यक्षपदाचा चित्रा वाघ यांनी दिला राजीनामा

By

Published : Jul 26, 2019, 11:40 PM IST

Updated : Jul 26, 2019, 11:53 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. वाघ यांनी अध्यक्षपदासह राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाघ या ३० जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वाघ यांना राष्ट्रवादीतून फोडून भाजपमध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्र्याचे अत्यंत जवळचे आमदार म्हणून ओळख असलेल्या प्रसाद लाड यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती जबाबदारी त्यांनी फत्ते केली असल्याने वाघ यांचा मोठ्या धुमधडाक्यात भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चित्रा वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर तातडीने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना ठोस आश्वासन दिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महिला आयोगावर नियुक्ती व्हावी, या अटीवर चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास होकार दिला असल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रसाद लाड आणि चित्रा वाघ एकमेकाला भाऊ-बहीण समजत असून ते अनेक वर्षांपासूनचे एकमेकांचे परिचित आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या भावा-बहिणीचे नाते राजकीय घडामोडीसाठी भाजपला फायद्याचे ठरले असल्याचेही बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी काल (गुरुवार) शिवसेनेत प्रवेश केला होता. आता, चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेससह राष्ट्रवादीतील काही नेते शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये काँग्रेस आमदार कालिदास कोलंबकर, जयकुमार शितोळे, सुनील केदारे आणि राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, अवधूत तटकरे यांचा समावेश आहे.

Last Updated : Jul 26, 2019, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details