नवी दिल्ली -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात ज्याप्रकारे शब्दप्रयोग केला, ते आश्चर्यचकित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
पत्रात शरद पवार म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाच्या धोरणात तुम्ही 'दो गज की दुरी' ही घोषणा दिली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने 'माझा परिवार माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत लोकांना एकमेकांमध्ये अंतर राखण्यासंदर्भात जागृत केले. तसेच महाराष्ट्र सरकारने 'दो गज की दुरी' ही मोहीम राबवण्यासंदर्भातही नियोजन करत आहे.
राज्यातील मंदिरे लोकांसाठी सुरू करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले, याबाबत मी माध्यमांत पाहिले. मात्र, तुम्हाला माहित आहे की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. इतकेच नव्हे, तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे कोरोनाच्या आधीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे साक्षी आहेत. यांसारख्या धार्मिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे जवळपास अशक्य आहे. यामुळे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत स्पष्ट निर्णय नाही घेतला.
मी इथे हेही नमूद करु इच्छितो की, माननीय राज्यपाल यांचे या विषयाबाबत व्यक्तिगत मत आणि दृष्टिकोन असू शकतो, या बाबीशी मी सहमत आहे. मी राज्यपाल या नात्याने मुख्यमंत्र्यांना आपले मत व्यक्त करणे याचेही मी कौतुक करतो. मात्र, राज्यपालांनी ज्याप्रकारे हे पत्र माध्यमांमध्ये जाहीर केले. तसेच ज्या प्रकारचा शब्दप्रयोग या पत्रात करण्यात आला ते पाहून मी आश्चर्यचकित आहे, असे पवार यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले.