नवी दिल्ली - महाराष्ट्रातील राजकारणाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काय पाऊले उचलावीत, याबाबत एकटी काँग्रेस निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे १७ नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून २० दिवस उलटले, तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटला नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
विधानसभेत सर्वात जास्त जागा मिळालेल्या भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शविल्यानंतर, राज्यपालांनी शिवसेनेला विचारणा सुरू केली होती. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नसल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी अर्ज करता आला नव्हता. त्यानंतर राष्ट्रवादीनेही सत्तास्थापनेस असमर्थता दर्शवली. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
शिवसेना आणि काँग्रेस दोन्हीही पूर्णपणे वेगळ्या विचारसरणीचे पक्ष आहेत. शिवाय, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्याला आपल्या प्रत्येक निर्णयाचा राष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होईल, याचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे, काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहेत. रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये या सर्व गुंत्यावर तोडगा निघेल का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा : सत्ता स्थापनेविषयी शरद पवारांचा मोठा खुलासा; वक्तव्यामुळे संभ्रम