नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची काल (बुधवारी) तब्बल सहा तासानंतर बैठक संपली. मात्र, आज (गुरुवार) पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरूच राहणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी बैठकीनंतर सांगितले. शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ मार्गावरील निवासस्थानी ही बैठक पार पडली. सकारात्मक बैठक झाल्याचा सूर आघाडींच्या नेत्यांचा होता.
संबंधित बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. तर, अहमद पटेल, जयराम रमेश, मल्लिकार्जून खर्गे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्वच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. जवळपास सहा तासांपासून ही बैठक सुरू होती.