नवी दिल्ली -अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केल्याचा दावा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) केला आहे. यासंदर्भात 4 अफगाण नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 380 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आल्याची माहिती एनसीबीने दिली.
दिल्लीत हेरॉईनची तस्करी करणाऱ्या 4 अफगाण नागरिकांना एनसीबीकडून अटक - हेरॉईन तस्करी
दिल्लीत निर्वासित म्हणून राहणाऱ्या ४ अफगाण नागरिकांना अटक करण्यात आली असून हे चारही जण दुभाषेच्या आड अमली पदार्थांचा व्यवसाय करत होते, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
30 सप्टेंबरला अफगाणिस्तानातून दिल्लीतील कुरिअर कंपनीत आलेल्या एका पार्सलमधून हेरॉईन ताब्यात घेण्यात आले होते. याचा तपास करताना दिल्लीत निर्वासित म्हणून राहणाऱ्या ४ अफगाण नागरिकांना अटक करण्यात आली. हे चारही जण दुभाषेच्या आड अमली पदार्थांचा व्यवसाय करत होते, या हेरॉईन तस्करी रॅकेटचा हँडलर हा अफगाणिस्तानात असून पार्सल देणाऱया व्यक्तीला पुढील व्यक्तीची ओळख कळू नये म्हणून त्याने अनेक ओळखी तयार केल्या आहेत, या चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे, एनसीबीचे विभागीय संचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.
"लॉकडाऊनपासून अफगाणिस्तानातील या ड्रग्स तस्करांनी कुरिअर पार्सलमधून हेरोईनचा आणायचा नवीन मार्ग शोधला आहे, अशीही माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.