सुकमा(छत्तीसगड) -सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या एका गटाने रस्त्याच्या कामावर असणाऱ्या सहा वाहनांना पेटवून दिले आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. कुकनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनीकोर्टा या गावाजवळ कुन्ना येथे नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील वाहने जाळल्याची माहिती सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी दिली आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून 450 किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांच्या गटाने दोन जेसीबी, एक पोकलॅन मशीन, तीन ट्रक पेटवून दिले. ही सर्व वाहने रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराच्या मालकीची होती, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
दिवसभरातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यास ठेकेदाराला सांगण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने सर्व वाहने त्या गावामध्येच ठेवल्यामुळे ही घटना घडली आहे. पोलिसांना गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिकडे तत्काळ धाव घेतली आणि शोधकार्य सुरू केले, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.
बस्तर विभागातील येणाऱ्या 7 जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये नक्षलवाद्यांकडून वारंवार अडथळे आणले जातात. सुकमा जिल्ह्यातही रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या वाहनांचे नुकसान करणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे , असे प्रकार केले जातात. या भागात विकास कामे झाल्यास, रस्त्याची कामे झाल्यास नक्षलवाद्यांना या भागातून जावे लागेल, अशी भीती त्यांना वाटते, असे पोलिसांनी सांगितले