रायपूर- सध्या कोरोनामुळे पूर्ण देशात लॉकडाऊन आहे. मात्र, छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवादी सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २ आठवड्यात नक्षलींनी पंधरापेक्षा जास्त हल्ले केले असल्याचे समोर आले आहे.
हत्या, वाहनांना आग लावणे यासारखे गुन्हे उघडकीस येत आहेत. आयडी बॉम्ब लावून जवानांवर हल्ले होत आहेत.
देशात लॉकडाऊन मात्र नक्षली हल्ल्यांत वाढ नक्षलींनी सुकमा जिल्ह्यातील दोरनापाल-जगरगुंडा मार्गावरील पुलाला बॉम्ब लावून उडवले आहे. तसेच सुकमामधीलच बडेसट्टीमध्ये एका गावातील व्यक्तीची हत्या, बॉम्ब लावून जवानाची हत्या यासारख्या घटना उघडकीस आल्या आहेत. याशिवाय बस्तर जिल्ह्यातील दरभाच्या भडरीमहू येथेही एका गावातील व्यक्तीची हत्या तसेच लोकांना जीवे मारण्याची धमकी असे प्रकार समोर आले आहेत.
लॉकडाऊनमध्ये बस्तर पोलिसांनीही सतत कारवाया सुरू ठेवल्या आहेत. दंतेवाडा आणि बिजापूरच्या सीमेवर चकमकीदरम्यान पोलिसांनी एका नक्षलीला ठार केले आहे. तसेच सहापेक्षा जास्त नक्षलवाद्यांना अटक केली आहे. नक्षली कारवाया वाढल्यामुळे पोलीसही सतर्क झाले असून नक्षलींविरोधात मोठे अभियान सुरू केले असल्याची माहिती आहे.