नवी दिल्ली - आज २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. हा दिवस भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जयंती दिनी साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला स्वर्ण पदक आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली. त्यांच्या प्रति सन्मान प्रकट करण्याकरिता दरवर्षी २९ ऑगस्ट या दिवस राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या रूपाने साजरा केला जातो. यावर्षी मेजर ध्यानचंद यांची ११५वी जयंती आहे.
दरवर्षी या दिनानिमीत्ताने क्रीडा विश्वात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या खेळातील विशेष योगदानाबद्दल सन्मानित केले जाते. यामध्ये राजीव गांधी खेल रत्न, ध्यानचंद पुरस्कार, द्रोनाचार्य पुरस्कार तसेत तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार, अर्जुन पुरस्कार इत्यादी विविध स्तरांवरील पुरस्कार दिले जातात. याबरोबरच खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचा देखील सत्कार केला जातो.
या व्यतिरीक्त २९ ऑगस्ट हा दिवस भारतातील सर्व शाळा आणि शिक्षण संस्था, विविध क्रिडा संस्थानमध्येही मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यावेळी विविध ठिकाणी मॅराथॉन, वॉकॅथॉन फूटबॉल, व्हॉलीबॉल, इत्यादींसारख्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
जाणून घेऊया मेजर ध्यानचंदबद्दल...
⦁ अलाहाबाद येथील एका राजपूत परिवारात २९ ऑगस्ट १९०५ ला मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला.
⦁ त्यांचे वडील सामेश्वर सिंह हे भारतीय सेनेत होते. ध्यानचंद देखील आपल्या वडीलांप्रमानेच भारतीय सेनेत दाखल झाले आणि येथूनच त्यांचा हॉकी प्रवास सुरू झाला.
⦁ त्यांचे खरे नाव ध्यानसिंह असे होते मात्र, ते नेहमी चंद्राच्या प्रकाशात हॉकीचा सराव करीत असत. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या नावात 'चंद' हा शब्द जोडला. नंतर ते ध्यानचंद या नावाने ओळखले जाऊ लागले.
⦁ मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलंपिक स्पर्धात हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला.
⦁ बर्लिन ऑलंपिक १९३६ मध्ये भारतीय संघाने जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या उपस्थितीत जर्मन संघाला अंतिमफेरीत ८-१ अशी धूळ चारली होती. या विजयासह सलग तीन ऑलंपिक स्पर्धात सुवर्णपदक जिंकून अनोखी किमया साधली.
⦁ मेजर ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीतील त्यांच्या २२ वर्षाच्या कारकिर्दीत ४०० पेक्षा जास्त गोल करत आपण 'गोल मशीन' असल्याचे सिद्ध केले होते.
⦁ सन १९५६ मध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या हॉकी खेळातील योगदानासाठी पद्म भूषण या सन्मानाने भुषविले. तर, भारतीय टपाल सेवेने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले.
⦁ ध्यानचंद हे भारतीय सेनेतून मेजर या पदावर असताना निवृत्त झाले.
⦁ आपल्या निवृत्तीनंतर देखील ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान कायम राहीले. पटियाला मधील राष्ट्रीय क्रीडा संस्थानमध्ये ते हॉकीचे मुख्य प्रशिक्षक होते. शिवाय त्यांनी राजस्थानमधील बऱ्याच प्रशिक्षण कॅम्पमधे देखील प्रशिक्षण दिले.
⦁ सन २००२ साली दिल्लीतील 'नॅशनल हॉकी स्टेडीयम' चे नामकरण मेजर ध्यानचंद नॅशनल हॉकी स्टेडीयम असे करण्यात आले.
दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्ताने एक थीम ठरवली जाते. यावर्षीची थीम 'फिट इंडिया यंग इंडिया' ही आहे. क्रिडाबद्दल अधिकाधिक माहिती, विविध खेळांचे महत्व सारख्या गोष्टींचे महत्व पटवून देणे आणि निरोगी व सुदृड भारत घडविणे हा या थीम मागचा उद्देश आहे.