हैदराबाद - व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. खेळाडू जीवनभर आरोग्यदायी राहतात. भारतामध्ये विविध क्रीडा प्रकार प्रसिद्ध आहेत. अनेक खेळाडू जागतिक स्तरावर चमकलेले आहेत. पी. टी. उषा यांना उडनपरी या नावाने संबोधले जाते तर सचिन तेंडुलकरला 'मास्टर ब्लास्टर' म्हटले जाते. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादुगर असे म्हटले जाते. राष्ट्रीय क्रीडा दिवस २९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो.
राष्ट्रीय क्रीडा दिनी व्यक्तीच्या जीवनात खेळांच्या महत्त्वाबाबत जनजागृती केली जाते. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सर्वांनी खेळ खेळले पाहिजेत, असा संदेश दिला जातो. या दिवशी राष्ट्रपती देशातील क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरव करतात.
मेजर ध्यानचंद हे हॉकीमध्ये जगभरात गाजलेले नाव आहे. त्यांना हॉकीचे जादुगार म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलाहाबाद शहरात झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९२२ ला ते भारतीय लष्करात रूजू झाले. ध्यानचंद यांच्यामध्ये एका खेळाडूचे सर्व गुण होते. लष्करातील सुभेदार मेजर मनोज तिवारी यांनी हॉकी खेळण्यासाठी ध्यानचंद यांना प्रवृत्त केले, त्यांना प्रोत्साहन दिले. स्वत: तिवारी यांना सुद्धा खेळांमध्ये आवड होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानचंद यांनी हॉकी खेळण्यास सुरुवात केली.
खेळांमध्ये उत्कृष्ट असल्यामुळे ध्यानचंद यांची १९२७ साली बढती 'लान्स नायक' पदावर झाली. त्यानंतर १९३२ साली नायक पदावर तर १९३६ साली हॉकी टीमचे कॅप्टन असताना त्यांची सुभेदार पदावर बढती झाली. नंतर लेफ्टनंट पदावरून त्यांची बढती मेजर म्हणून झाली.
मेजर ध्यानचंद हॉकी खेळण्यात अतिशय निपूण होते. त्यांना देशातील सर्वकालीन उत्कृष्ट हॉकी खेळाडू समजले जाते. हॉकी खेळताना चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात, फटका मारण्यात, विरोधी खेळाडूकडून अलगद चेंडू काढून घेण्यात, एखादा नवीनच सर्जनशील फटका मारण्यात ते माहीर होते. त्यांनी भारतीय हॉकीला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले. ऑलम्पिकमध्ये भारताला हॉकीत त्यांनी ३ सुवर्ण पदके मिळवून दिली. १९२८, १९३२ आणि १९३६ साली भारताने हॉकीतील सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली. २२ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ४०० पेक्षा जास्त गोल केले, तर कारकीर्दीत १ हजारांपेक्षा जास्त गोल केले. १९२६ ते १९४८ या काळात त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राला एक नवी उंची गाठून दिली. त्यांच्यापासून अनेक खेळाडूंनी प्रेरणा घेतली.
राष्ट्रीय क्रीडा दिन २९ ऑगस्टला देशपातळीवर साजरा केला जातो. राष्ट्रपती भवनात या दिवशी समारोह आयोजित केला जातो. क्रीडा क्षेत्रातील मानाचे पुरस्कार विविध खेळाडूंना दिले जातात. यावर्षी कोरोनाचे संकट पाहता पुरस्कार वितरणाचा सोहळा पहिल्यांदाच ऑनलाईन पार पडणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुरस्कार विजेत्या खेळाडूंना सन्मानित करणार आहेत.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचा इतिहास....
खेळाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याबरोबरच या दिनी मेजर ध्यानचंद यांचे खेळातील योगदान अधोरेखित केले जाते. भारताची समृद्ध क्रीडा संस्कृती आणि वारशात ध्यानचंद यांनी दिलेल्या योगदानाला उजाळा दिला जातो. ध्यानचंद एकमेव खेळा़डू आहेत, त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.
जाणून घेऊया मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल...