राष्ट्रीय डॉक्टर दिन हा दरवर्षी १ जुलैला साजरा करण्यात येतो. आपल्या अमूल्य सेवेसाठी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री आणि नावाजलेले डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे आयोजन करण्यात येते.
डॉक्टरांचे महत्त्व हे वेगळे सांगण्याची गोष्ट नाही. विशेषतः कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व पाहतोच आहे, की हे कोविड योद्धे कसे दिवस-रात्र एक करत लोकांची सेवा करत आहेत. कार्ल जुंग या स्विस मनोवैज्ञानिकाने म्हटल्याप्रमाणे, "रोगांना ठीक करण्यासाठी औषधांची गरज भासते, मात्र रोग्यांना ठीक करण्यासाठी डॉक्टरच हवेत".
केंद्र सरकारने १९९१ ला डॉक्टर दिनाची घोषणा केली. भारतात १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन असतो. तर, अमेरिकेत ३० मार्च, क्युबामध्ये तीन डिसेंबर आणि इराणमध्ये २३ ऑगस्ट हा डॉक्टर दिन असतो.
डॉ. बिधान चंद्र रॉय...
डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ला बिहारमध्ये झाला. डॉक्टर होण्याचा त्यांचा ध्यास हा अचंबित करणारा होता. इंग्लंडच्या सेंट. बार्थोलोम्यूस रुग्णालयात दाखल होण्यासाठीचा त्यांचा अर्ज ३० वेळा फेटाळण्यात आला, तरीही त्यांनी हार मानली नव्हती. त्यांनी आपले वैद्यकीय पदवी कलकत्त्याहून घेतली, तर एमआरसीपी आणि एफआरसीएस पदव्या या इंग्लंडहून मिळवल्या होत्या. १९११मध्ये त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर त्यांनी कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयात काम करणे सुरू केले. त्यानंतर कॅम्पबेल वैद्यकीय महाविद्यालय आणि कार्मिशेल वैद्यकीय महाविद्यालयातही त्यांनी काम केले.