महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 updates : तिसऱ्या देशव्यापी लॉकडाऊनला सुरुवात; वाचा देशभरातील सर्व घडामोडी एका क्लिकवर..

COVID-19 updates LIVE
COVID-19 updates LIVE

By

Published : May 4, 2020, 9:24 AM IST

Updated : May 4, 2020, 8:12 PM IST

19:54 May 04

तामिळनाडूमधील दारुची दुकाने सात तारखेनंतर होणार सुरू..

चेन्नई- तामिळनाडू सरकारने राज्यातील दारुच्या दुकाने उघडण्यासाठीचा मुहूर्त निश्चित केला आहे. सात मे पासून राज्यातील सरकारमार्फत चालवली जाणारी दारुची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. राज्यामधील कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने उघडण्यात येणार आहेत.

19:47 May 04

लॉकडाऊनचा नियम मोडल्यामुळे आमदारासह सात जणांना अटक..

लखनऊ- उत्तरप्रदेशच्या महाराजगंजमध्ये लॉकडाऊनचा नियम मोडल्याबद्दल आमदारासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अमन त्रिपाठी असे या आमदाराचे नाव आहे. आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांच्या तेराव्याला जात असल्याचे कारण या आमदाराने पुढे केले आहे.

19:41 May 04

एसएसबीचे १३ जवान कोरोन पॉझिटिव्ह..

नवी दिल्ली - सशस्त्र सेना बल म्हणजेच एसएसबीच्या १३ जवानांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये पोस्टिंग असलेल्या '२५ बटालियन'च्या २५ जवानांपैकी १३ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यांमधील चार जवानांचा अहवाल मागील आठवड्यात प्राप्त झाला होता, तर बाकी जवानांचे अहवाल आज मिळाले आहेत.

19:37 May 04

दिल्लीच्या संगम विहार परिसरातल्या एकाच घरातील ११ जणांना कोरोनाची लागण..

नवी दिल्ली- शहरातील संगम विहार परिसरातील १७ नंबर गल्लीत असणाऱ्या एकाच घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यांमध्ये घरातील ६ भाडेकरुंचाही समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी या घरातील लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी नमुने गोळा केले होते, त्यानंतर आता आज त्या चाचणीचा अहवाल आला आहे. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या २० जणांची ओळख पटवण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

18:58 May 04

ओडिशाच्या ग्रीन झोन्समधील बससेवा सुरू, मात्र लागू केली ही अट..

भुवनेश्वर - ओडिशा सरकारने राज्याच्या ग्रीन झोन्समधील बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांमधील लोकांना जिल्ह्यांतर्गत प्रवास करता येणार आहे. मात्र या बसेस आपल्या क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवासीच घेऊन जातील, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

18:57 May 04

दिल्ली हिंसाचारात बळी गेलेल्या अंकितच्या कुटुंबीयांना मिळणार एक कोटींची मदत..

नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारात मृत्यू झालेल्या आयबी विभागातील कर्मचारी अंकित शर्माच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

सविस्तर वाचा :दिल्ली हिंसाचार: अंकित शर्माच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकार देणार १ कोटीची मदत

18:09 May 04

लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही, तर नाईलाजाने पुन्हा निर्बंध लावावे लागतील - केजरीवालांचा इशारा

नवी दिल्ली -तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दिल्लीमधील बरेच निर्बंध हटवत केजरीवाल सरकारने सरकारी व खासगी कामे सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच शहरातील दारुची दुकानेही खुली करण्यात आली होती. मात्र, दारुच्या दुकानांबाहेर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने, दुपारनंतर बऱ्याच दुकानांना बंद करावे लागले होते. हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हणत, लोकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत तर नाईलाजाने आम्हाला शहरातील निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील, असा इशारा केजरीवाल यांनी दिला आहे.

18:08 May 04

सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही, तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढेल..

नवी दिल्ली - 'नागरिकांना निर्बंधांपासून सूट देण्यात आली आहे. पण, जर सोशल डिस्टंसिंग पाळलं गेल नाही, तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालायचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी आज दिला आहे.

सविस्तर वाचा :सोशल डिस्टंसिंग पाळलं नाही तर... आरोग्य मंत्रालयाचा इशारा

17:59 May 04

देशात गेल्या २४ तासांमध्ये २,५७३ नव्या रुग्णांची नोंद; एकूण रुग्णांची संख्या ४२,८३६वर..

नवी दिल्ली - देशात गेल्या २४ तासांमध्ये २,५७३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ४२,८३६वर पोहोचली असून, त्यांपैकी एकूण २९,६८५ रुग्ण हे अ‌ॅक्टिव्ह आहेत. यासोबतच, आतापर्यंत ११,७६२ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून, देशात कोरोनामुळे १,३८९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

17:58 May 04

चेन्नईमध्ये एका दिवसात सव्वापाचशे रुग्णांची वाढ; दिवसभरात एकाचा मृत्यू..

चेन्नई -  तामिळानडूमध्ये आज कोरोनाचे ५२७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३,५५०वर पोहोचली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत १,४०९ लोकांवर यशस्वी उपचार झाला असून  त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आज झालेल्या एका मृत्यूंनंतर राज्यातील बळींची संख्या ३१ झाली आहे.

17:23 May 04

कोरोनाचा परिणाम - यूपीएससीची पूर्व परिक्षा रद्द!

दिल्ली -जगभरात विळखा घातलेल्या कोरोनाचा दिवसेंदिवस देशात प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाईन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा अनेक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. या कोरोनाच्या परिस्थितीमुळे नागरी सेवा पूर्व परीक्षा (युपीएससी) 2020 ही स्थगीत करण्यात आली आहे. यांसदर्भात युपीएससीने आज एक पत्रक काढले आहे.

सविस्तर वाचा :युपीएससीची पूर्व परीक्षा रद्द, 20 मे नंतर परिस्थिती पाहून निर्णय

17:22 May 04

शिमलाच्या बाजापेठा फुलल्या..

शिमला - तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवताना सरकारने काही प्रमाणात सूट जाहीर केली आहे. त्यामुळे काही राज्यात बाजारपेठा सुरु होताना दिसत आहे. हिमालचप्रदेशातही बाजापेठा उघडल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. तब्बल ४० दिवसानंतर दुकाने उघडली आहेत.

सविस्तर वाचा :हिमाचलप्रदेश: लॉकडाऊनमध्ये सुट मिळताच शिमल्यातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी

17:13 May 04

केरळमध्ये दोन दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण नाही; आज दिवसभरात ६१ रुग्णांना डिस्चार्ज..

तिरुवअनंतपुरम- केरळमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये एकाही नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली नाही. तसेच सोमवारी दिवसभरात ६१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४९९ आहे. त्यांपैकी केवळ ३४ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी दिली आहे.

15:51 May 04

राजस्थानमधील रुग्णांनी ओलांडला तीन हजारांचा टप्पा; राज्यात आज सहा नव्या बळींची नोंद..

जयपूर - राजस्थानमध्ये आज कोरोनाचे १३० नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३,०१६वर पोहोचली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत १,३९४ लोकांवर यशस्वी उपचार झाला असून, ९३७ लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आज झालेल्या सहा मृत्यूंनंतर राज्यातील बळींची संख्या ७७ झाली आहे.

15:22 May 04

स्थलांतरीत मजूरांच्या जमावाची पोलिसांवर दगडफेक; सूरतमधील प्रकार..

गांधीनगर - गुजरातच्या सूरतमध्ये स्थलांतरीत मजूरांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. आपल्याला आपल्या राज्यामध्ये परत पाठवण्याची सोय करावी अशी या मजूरांची मागणी होती.

15:19 May 04

बेळगावात मद्यप्रेमीचे जंगी स्वागत; पहिल्या ग्राहकाला दुकानदाराने घातला हार..

बेळगाव- तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये आता देशात विविध ठिकाणी दारू विक्रीस परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या बेळगावमध्ये ग्राहक ही भगवान होता है, असे म्हणते एका दुकानदाराने तळीरामाचे चक्क हार घालून स्वागत केले.

सविस्तर वाचा :'ग्राहक ही भगवान होता है', बेळगावात दुकानदाराने केले तळीरामाचे हार घालून स्वागत

15:18 May 04

कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर नातेवाईक अनुपस्थित; सफाई कर्मचाऱ्यांनी केला अंत्यसंस्कार..

भोपाळ -कोरोना संसर्गामुळे देशात आत्तापर्यंत १ हजार ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना सरकारला विषेश काळजी घ्यावी लागत आहे.त्यासाठी सरकारने नियमावली घालून दिली आहे. फक्त काही ठराविक नातेवाईकांनाच अंत्यसंस्काराला येण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक अंत्यसंस्कार कुटुंबीयांविनाही होत आहेत. अशा परिस्थितीत इंदौर शहरात सफाई कर्मचारी अंत्यसंस्कार करण्यास मदत करत आहेत.

सविस्तर वाचा :कोरोनाग्रस्त मृतदेहांवर नातेवाईकांच्या अनुपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार

15:17 May 04

लॉकडाऊन विशेष : यूपी-उत्तराखंड सीमेवर पार पडला विवाह सोहळा..

बिजनोर (यू.पी)- देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी लग्न संमारंभांना प्रशासनाकडून परवानगी नकारण्यात येत आहे. त्यामुळे, मोजक्या नातेवाईकांसह विवाह इच्छुक युवक-यवती घरात लग्न करताना दिसून येत आहे. मात्र, बिजनोरमधील एका युवकाने चक्क उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आपला विवाह संपन्न केला आहे.

सविस्तर वाचा :एक विवाह असाही...यूपी-उत्तराखंड बॉर्डरवरच पार पडले लग्न

15:09 May 04

गाझियाबादमध्ये ओला आणि उबर सेवा सुरू..

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ओला आणि उबर या ऑनलाईन टॅक्सी सेवा पूर्ववत झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये या सेवा पूर्णपणे बंद असल्याने चालकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता या चालकांना दिलासा मिळाला आहे. त्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत टॅक्सी चालवावी लागणार आहे.

15:05 May 04

परराज्यातून आलेल्या मजूरांना बिहार सरकार देणार प्रत्येकी हजार रुपये..

पाटणा- परराज्यांमधून परत आलेल्या कामगारांना बिहार सरकार प्रत्येकी एक हजार रुपये देणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत माहिती दिली. दुसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या कामगारांना प्रवासभाड्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत. तसेच, त्यांना बिहारमध्ये आल्यानंतर २१ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर, प्रत्येक मजूराला एक हजार रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी राज्यातील १९ लाख मजूरांना अशी मदत दिले गेल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.

13:27 May 04

नागरिकांनी केले नाही सोशल डिस्टन्सिंगचे पालन; दिल्लीमधील दारुचे दुकान बंद!

नवी दिल्ली- शहराच्या कॅरोल बाग परिसरातील एका दारुच्या दुकानाबाहेर लोकांची सुमारे एक किलोमीटर लांब रांग लागली होती. यावेळी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी केल्यामुळे, पोलिसांनी या दुकानाला टाळे ठोकले आहे.

13:26 May 04

कर्नाटकमध्ये आढळले कोरोनाचे २८ नवे रुग्ण..

बंगळुरू -कर्नाटकमध्ये गेल्या १८ तासांमध्ये कोरोनाचे २८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६४२वर पोहोचली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ३०४ लोकांना डिस्चार्ज मिळाला असून, कोरोनामुळे २६ लोकांचा बळी गेला आहे.

13:25 May 04

आंध्र प्रदेशमध्ये ६७ नव्या रुग्णांची नोंद; गेल्या २४ तासांमध्ये एकही बळी नाही..

अमरावती - आंध्र प्रदेशमध्ये गेल्या १६ तासांमध्ये कोरोनाचे ६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६५०वर पोहोचली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ५२४ लोकांना डिस्चार्ज मिळाला असून, कोरोनामुळे ३३ लोकांचा बळी गेला आहे.

13:18 May 04

कोरोना इफेक्ट - 'जेएनयू' राहणार १७ मेपर्यंत बंद..

नवी दिल्ली - देशभरात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन कालावधी वाढविला असून 17 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येत्या 17 मे पर्यंत बंद राहील अशी अधिसूचना कुलसचिव प्रा. प्रमोद कुमार यांनी जारी केली आहे.

सविस्तर वाचा :LOCKDOWN : दिल्लीतील जेएनयू 17 मे पर्यंत राहणार बंद, विद्यापीठाकडून अधिसूचना

13:17 May 04

ट्रक वाहतूकीस परवानगी; मात्र आता समोर आली नवी अडचण..

नवी दिल्ली - देशात लॉकडाऊन सुरू असताना केंद्र सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ट्रक वाहतुकीला परवानगी देण्यात आली. मात्र, आताही ट्रक चालकांना वाहतुकीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कडून सांगण्यात आले.

सविस्तर वाचा :वाहतुकीसाठी परवानगी मिळूनही ट्रक अडकले, 'या' आहेत अडचणी

13:16 May 04

झारखंडमधील १२ नागरिक मुंबईहून दुचाकीवर गेले घरी..

रांची- लॉकडाऊनमुळे गावाकडे परतायला कसलाही मार्ग नसल्याने अनेक जण चालत, सायकलीवरून गेल्याची उदाहरणे बघायला मिळाली आहेत. सोशल मीडियावरून या लोकांना प्रसिद्धी मिळाली. त्यांची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. असेच मुंबईमधून 12 जण झारखंडमधील लोहरदगामध्ये दुचाकीवरून पोहोचल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा :LockDown 3.0 : मुंबईतून 12 जण दुचाकीवरून पोहोचले झारखंडला

13:11 May 04

हुजूर साहेब दर्गामधील लोकांची महाराष्ट्राने चाचणीच केली नव्हती; पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा आरोप..

चंदीगड - महाराष्ट्र सरकारने नांदेडहून परत पाठवलेल्या लोकांची कोरोना चाचणी केलीच नव्हती असा आरोप पंजाबच्या आरोग्य मंत्र्यांनी केला आहे. त्यांनी चाचणी केली नसल्याचे आम्हाला आधीच सांगितले असते, तर आम्ही त्यानुसार काही योजना आखली असती, असेही बलबीर एस. सिंधू यांनी म्हटले आहे.

12:52 May 04

मजूरांचा प्रवास आता होणार मोफत; केंद्र आणि राज्य सरकार उचलणार खर्च..

नवी दिल्ली-लॉकडाऊन काळात स्थलांतरित श्रमिकांना बस आणि ट्रेनच्या सहायाने त्यांच्या राज्यात पोहचविण्यात येत आहे. यावेळी सरकार रेल्वे प्रवास भाडे आकारत असल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. त्यांनतर आता, केंद्र सरकारने हा खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. आता कामगारांच्या वाहतुकीसाठी चालविल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांसाठी रेल्वे तिकीट भाड्याच्या 85 टक्के अनुदान केंद्राने देण्याचे ठरविले आहे. तर उर्वरीत १५ टक्के रक्कम राज्य सरकारला द्यावी लागेल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

12:52 May 04

दाम्पत्याला शौचालयात केले क्वारंटाईन, तिथेच दिले जात होते जेवण..

भोपाळ - सोशल डिस्टंसिंग आणि विगलीकरणाच्या नावाखाली मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील गुना जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत दाम्पत्याला चक्क शौचालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे सर्व सामानही शौचालयात ठेवण्यात आले होते, एवढेच नाही तर त्यांना शौचालयातच जेवण दिले जात होते.

सविस्तर वाचा :संतापजनक..!  दाम्पत्याला चक्क टॉयलेटमध्ये क्वारंटाईन, शौचालयातच दिले जेवण

12:49 May 04

पंजाबमधील स्थलांतरीत मजूर घरी जाण्यासाठी रस्त्यावर..

चंदीगड - लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी पाठविण्यासाठी गुरुग्राम येथील खोह गावात नोंदणी सुरु असल्याची अफवा स्थलांतरीत मजूरांमध्ये पसरली. त्यानंतर हजारो मजूर गावातील शाळेमध्ये नोंदणी करण्यासाठी जमा झाले होते. मात्र, तेथे कसलीही नोंदणी सुरू नव्हती. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सौम्य लाठीचार्ज करत पांगविले.

सविस्तर वाचा :घरी जाण्यासाठी स्थलांतरित मजुरांची धडपड, एका अफवेने हजारोंचा जमाव रस्त्यावर

12:11 May 04

देशातील रखडलेली बांधकामे पुन्हा सुरू करण्यास केंद्राची परवानगी..

नवी दिल्ली- केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील बांधकामांच्या कामांना सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे. ज्याठिकाणी मजूर उपलब्ध आहेत, त्याठिकाणची कामे सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. काम सुरू झाल्यामुळे आता मजुरीही मिळणार असल्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.

12:09 May 04

आंध्रप्रदेशमधील नागरिकांना दारुसाठी मोजावे लागणार जादा पैसे..

विजयवाडा (आंध्रप्रदेश) -केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीनंतर ज्या-त्या राज्याने आपापल्या परिने सशर्त परवानगी दिली आहे. आंध्रप्रदेश सरकारनेही परवानगी दिली आहे. पण, मद्यपींनी दारुकडे पाठ फिरवावी म्हणून निषेधकर लावण्यात आला आहे.

सविस्तर वाचा :आंध्रप्रदेशात दारु विक्रीला परवानगी, महसूल वाढविण्यासाठी लागणार 'निषेध कर'

11:03 May 04

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४२,५३३; मागील २४ तासांत २,५५३ बाधित..

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांनी ४० हजारांचा टप्पा पार केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात ४२ हजार ५३३ रुग्ण झाले आहेत. यातील २९ हजार ४५३ अ‍‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. ११ हजार ७०७ रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले असून १ हजार ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

10:54 May 04

आंध्र प्रदेश, गोवामध्ये केशकर्तनालये सुरू; सरकारने नेमून दिलेले निर्बंधही राहणार लागू..

देशातील विविध भागांमध्ये लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांनाही ठरावीक झोनमध्ये सुरू ठेवण्याची परवानगी विविध राज्य सरकारांनी दिली आहे. त्यानुसार गोवा आणि आंध्र प्रदेशमधील केशकर्तनालयेही आजपासून सुरू झाली आहेत.

10:44 May 04

आतापर्यंत देशातील ११ लाख लोकांची झाली कोरोना चाचणी..

नवी दिल्ली -आतापर्यंत देशातील ११ लाखांहून अधिक लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने याबाबत माहिती जाहीर केली. देशातील एकूण कोरोना चाचणी झालेल्या नागरिकांची संख्या ११,०७,२३३ आहे.

10:41 May 04

देशात दारू विक्रीला सुरुवात; खरेदीसाठी मद्यपींच्या रांगा..

नवी दिल्ली - देशभरात तिसरे लॉकडाऊन लागू झाले आहे. यामध्ये देशाच्या विविध भागांमध्ये दारु विक्रीस सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आज पहाटेपासूनच देशाच्या विविध भागांमधील दारुच्या दुकानासमोर मद्यपींच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत लोक दारू खरेदी करताना दिसून येत आहेत.

सविस्तर वाचा :लॉकडाऊन ३.० : देशातील विविध भागांमध्ये दारु विक्री सुरू; दुकानांबाहेर पहाटेपासूनच लागल्या रांगा..

10:37 May 04

केरळमधून स्थलांतरीत कामगारांना घेऊन पाच रेल्वे रवाना..

नवी दिल्ली - सरकारने कामगारांना गावी स्थलांतरासाठी परवानगी दिल्यानंतर वेगवेगळ्या राज्यातून अनेक कामगारांनी प्रवासाला सुरुवात केली आहे. रविवारी केरळमधूनही तब्बल 5 हजार 700 बिहारी कामगारांनी वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवरुन आपल्या राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्या पकडल्या.

सविस्तर वाचा :5 हजार 700 बिहारी कामगार परतणार स्वगृही, केरळमधून 5 रेल्वे रवाना

10:33 May 04

त्रिपुरामध्ये बीएसएफच्या चौदा जवानांना कोरनाची लागण..

आगरताळा- त्रिपुरामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या आणखी बारा जवानांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी दोन जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

10:30 May 04

रेल्वे मंत्रालयावर काँग्रेसचे टीकास्त्र; कामगारांच्या प्रवासाचा खर्च उचलण्याची दर्शवली तयारी..

नवी दिल्ली -लॉकडाऊन काळात स्थलांतरित श्रमिकांना बस आणि ट्रेनच्या सहायाने त्यांच्या राज्यात पोहचविण्यात येत आहे. यावेळी सरकार रेल्वे प्रवास भाडे आकारत असल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे. 'गरजू कामगारांना घरी परतण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस पक्ष उचलेल', अशी घोषणा काँग्रेसने टि्वट करून केली आहे.

यासोबतच, रेल्वे मंत्रालयाकडे पीएम केअर फंडात जमा करायला १५१ कोटी रुपये आहेत, मात्र ज्यांच्या श्रमातून हा देश उभा राहातो त्या श्रमिकांना घरी पोहचवण्यासाठी रेल्वे मंत्रालय तिकीट वसूल करत असल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रेल्वे मंत्रालयावर निशाणा साधला आहे.

सविस्तर वाचा :पीएम केअर फंडात जमा करायला रेल्वेकडे कोट्यवधी रुपये, श्रमिकांकडून मात्र वसूल केले तिकीट - काँग्रेसचा रेल्वे मंत्रालयावर निशाणा

09:12 May 04

दिल्लीमधील सर्व सरकारी अन् खाजगी कार्यालये होणार सुरू..

नवी दिल्ली - आजपासून (4 मे) दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालये उघडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांमध्ये 100 टक्के हजेरी राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सविस्तर वाचा : आजपासून दिल्लीतील सरकारी, खासगी कार्यालये खुली - केजरीवाल

09:00 May 04

तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात; निर्बंधांसह विविध व्यवसाय सुरू..

नवी दिल्ली - देशात आजपासून तिसरा लॉकडाऊन लागू होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आजपासून १७ मे पर्यंत हा देशव्यापी लॉकडाऊन लागू असणार आहे.

दरम्यान, देशातील विविध भागांमधील व्यवसाय निर्बंधांसह सुरू करण्यात आले आहेत. देशातील जिल्ह्यांचे तीन झोन्समध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, विविध झोनमधील व्यवसायांना वेगवेगळे नियम आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर, कंटेन्मेंट झोन्समध्ये मात्र केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत.

सविस्तर वाचा :लाॅकडाऊन ३.० : रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये 'या' सुविधा सुरू...

Last Updated : May 4, 2020, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details