‘नितीन गडकरींना कृषीमंत्री करा’, पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर पाठवणाऱ्या शेतकऱ्याची मागणी
‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करु इच्छितो. यामुळेच परंपरेनुसार मी त्यांना एक पांढरी टोपी आणि दोन मोठे रुमाल पाठवले आहेत. नितीन गडकरी यांना कृषीमंत्री करण्यात यावे, यासाठी मी नरेंद्र मोदींकडे आग्रह केला आहे. जेणेकरुन आमच्या सर्व समस्या सुटतील,’ असे संजय साठे यांनी सांगितले.
मुंबई - मागील वर्षी नाशिकमधील एका शेतकऱ्याने कांदा मातीमोल भावात विकावा लागल्याने मिळालेले पैसे निषेध म्हणून पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर करून पाठवले होते. आता त्याच शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून नितीन गडकरी यांना कृषीमंत्री करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. संजय साठे असे या शेतकऱयाचे नाव आहे.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व भाजपच्या भव्य विजयाबद्दल या पत्रातून अभिनंदन केले आहे. त्यासह एक गांधी टोपी, दोन रुमाल भेट म्हणून पाठविले आहेत.
‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करु इच्छितो. यामुळेच परंपरेनुसार मी त्यांना एक पांढरी टोपी आणि दोन मोठे रुमाल पाठवले आहेत. नितीन गडकरी यांना कृषीमंत्री करण्यात यावे, यासाठी मी नरेंद्र मोदींकडे आग्रह केला आहे. जेणेकरुन आमच्या सर्व समस्या सुटतील,’ असे संजय साठे यांनी यासंबंधी बोलताना सांगितले.
गडकरी नागपूर मतदार संघातून पुन्हा निवडून आले आहेत. ते रस्ते, वाहतूक, महामार्ग, जहाजाच्या माध्यमातून वाहतूक, जलस्रोत, नद्या विकास, गंगा शुद्धीकरण या खात्यांचे केंद्रीय मंत्री होते. त्यांना कृषीमंत्री बनवण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे.
गतवर्षी संजय साठे यांनी ७४० किलोग्रॅम कांद्याला कवडीमोल भाव आल्याने त्याच्या विक्रीतून आलेली रक्कम सरकारचा निषेध करत पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर केली होती. लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात लिलावासाठी आणलेल्या कांद्याला अत्यंत कवडीमोल भाव मिळाला होता. त्यामुळे संजय साठे यांनी विक्रीतून आलेली १०६४ रुपयांची रक्कम मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून कांदा उत्पादकांच्या व्यथा समोर आणली होती. साठे यांनी केलेली ही मनी ऑर्डर परत आली होती. पोस्ट कार्यालयाने संजय साठे यांना बोलावून त्यांच्याकडे १०६४ रुपयांची रक्कम सुपूर्त केली होती.