भुवनेश्वर :वनप्रदेश नष्ट होणे ही पृथ्वीसमोरील गंभीर समस्या बनली आहे. बेकायदा आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीबरोबरच, वणवा किंवा जंगलातील आग हेदेखील वनप्रदेश नष्ट होण्याचे मोठे कारण ठरत आहेत. नुकत्याच अमेझॉनच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात वनप्रदेश नष्ट झाला होता.
ओडिशाच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले वणव्याचा इशारा देणारे यंत्र; 'नासा'ने केले कौतुक! हेच लक्षात घेऊन ओडिशामधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी यासंदर्भात उपाय करण्याचे ठरवले. याच प्रयत्नात, त्यांनी असे उपकरण विकसीत केले आहे, ज्याद्वारे जंगलात लागलेल्या आगीची माहिती क्षणार्धात वनविभागाला मिळू शकते. 'ज्युएल बेटेल' (JUEL BETEL) असे या उपकरणाचे नाव त्यांनी ठेवले आहे. या उपकरणाचे 'नासा'ने कौतुक केले आहे, तर वन विभागाने या दोघांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आमंत्रित केले आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणे विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या प्रत्युष आणि प्रमित या दोन विद्यार्थ्यांनी हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाचे वैशिष्ट म्हणजे, दर वीस मिनिटांनी हे उपकरण जंगलातील परिस्थितीची माहिती वनविभागाला पाठवत राहते. या दोघांनी २०१८च्या ऑक्टोबरमध्ये याच्या संशोधनावर काम सुरु केले होते, तर २०१९च्या जून महिन्यात हे उपकरण तयार झाले.
नासा अंतराळ संशोधन संचलनालयामार्फत दरवर्षी 'आय-टेक सायकल' स्पर्धा घेण्यात येते, ज्यामध्ये जगभरातून नवनवीन उपकरणे सादर केली जातात. यावर्षी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये २५ उपकरणे पोहोचली होती, ज्यामध्ये 'ज्युएल बेटेल'चा समावेश होता. विशेष म्हणजे, संपूर्ण आशिया खंडातून हे एकमेव उपकरण उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते.
हेही वाचा : बजाजच्या चेतक ई-स्कूटरचे लाँचिंग; ५ तासांच्या चार्जिंगवर ९५ किमीचे कापते अंतर