नवी दिल्ली - दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये उत्तर पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीतील आरोपींचे पोस्टर पाहायला मिळाले, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताच्या हवाल्याने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना आंदोलन संपवण्याची विनंती केली.
आम्ही दुरुस्ती प्रस्ताव शेतकऱ्यांना पाठवला आहे. यावर त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आमच्याकडे आली नाही. त्यांनी प्रस्ताव नाकारल्याची माहिती माध्यमांद्वारे आम्हला कळाली. सध्या त्यांच्याकडून चर्चेचा काहीच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यास आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.
कृषी कायद्यांविरोधात सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना ज्या कायद्यांवर आक्षेप असेल. त्या कायद्यातील तरतुदींचा उघडपणे विचार करण्यास सरकार तयार आहे, असे सरकारने म्हटलं आहे. तर तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला आहे. आतपर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. तीन्ही कायदे रद्द करावीत. तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.