नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जनतेशी मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी महामारीच्या लढाईत सहकार्य केल्याबद्दल देशवासियांचे आभार मानले. तसेच कोरोनाची लढाई पीपल ड्रिव्हन असल्याची उपमा त्यांनी दिली. हा संपूर्ण लढा जनतेचा असल्याचे ते म्हणाले. समाजातील सर्व पातळ्यांवरील घटक यासाठी एकत्र लढत असून देश आणखी एकवटल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
केंद्र सरकारने कोरोनाच्या दरम्यान covidwarriors.gov.in ही वेबसाईट उपलब्ध केली. या संकेतस्थळावरून महिनाभरात सव्वाकोटी लोक एकत्र आल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. हे सर्व सिव्हिल वॉरियर्स देशासमोर आदर्श उभा करत असल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये डॉक्टर्स, आशा वर्कर्स, स्वयंसेवक, विविध क्षेत्रातील व्यक्ती, स्थानिक प्रशासन यांना एकत्र जोडलयं. या लढाईत सर्वांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भारताने महामारीच्या काळात जगासमोर आदर्श उभा केल्याचे त्यांनी सांगितले. भारताने आतापर्यंत जगातील सर्व गरजू देशांना सहकार्य पोहोचवले आहे. तसेच औषधांचा पुरठा देखील केल्याचे पंतप्रधान म्हणाले.