वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील ह्युस्टन येथे जोरदार आगमन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत लाखो निवासी भारतीयांनी पंतप्रधानांना 'हाउडी मोदी' असे म्हणत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी, 'भारतात सर्व छान चाललं आहे', असे म्हणून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मी एकटा काहीही करू शकत नाही. मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा व्यक्ती आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. तसेच भारताचा खरा मित्र कोणी असेल, तर तो व्हाईट हाऊस मध्येच आहे, असे सांगून दोनही देशांमधील मैत्रीचे संबंध ठळक केले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी 'अबकी बार, ट्रम्प सरकार' चा नारा देऊन उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. जागतिक राजकारणात ट्रम्प यांचे मोठे योगदान असून,त्यांनी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंधांसाठी प्रयत्न केल्याचे मोदी म्हणाले.
मला २०१७ मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घडवली होती. मी आज त्यांना माझ्या कुटुंबाची भेट घडवत असल्याचे म्हणून मोदींनी उपस्थित भारतीयांकडे हात दाखवल्यानंतर नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. तसेच ट्रम्प यांच्या कुटुंबाला भारत दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण यावेळी पंतप्रधानांनी दिले. ह्यूस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बेंगळुरू, शिकागोपासून शिमला आणि लॉस एंजल्सपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध आहेत,असे मोदींनी सांगितले.