नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर सेंट्रल हॉल, नवी दिल्ली येथे एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी संसदीय सभागृहातील संविधानासमोर नतमस्तक झाले. यावेळी उपस्थित खासदारांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
VIDEO : मोदी संविधानासमोर झाले नतमस्तक... - लोकसभा
एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी संसदीय सभागृहातील संविधानासमोर नतमस्तक झाले. यावेळी उपस्थित खासदारांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व घटकांना न्याय देण्यासाठी घटना तयार केली आहे. त्याच्या चौकटीत राहून काम केले तर, कोणत्याही संकटाला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही. आपण संविधानाची साक्ष ठेवून संकल्प करू की, देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करुन त्यांना समाजात पुढे आणण्याचा प्रयत्न करू. समाजातील जातीभेद दूर करू. सबका साथ आणि सबका विकास हा आपला मंत्र आहे. महात्मा गांधी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि राममनोहर लोहिया या महापुरुषांचे विचार घेऊन पुढे चला. आज राजकारणात त्यांच्या विचारधारा तुम्हाला प्रगल्भ बनवण्याचे काम करतात.
बैठकीच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यासाठी अमित शाह यांनी प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला प्रकाशसिंह बादल, उद्धव ठाकरे, रामविलास पासवान, नितिश कुमार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी समर्थन देत एकमताने मोदींची निवड केली. मोदींची निवड झाल्यानंतर अमित शाह यांनी सर्वांचे आभार मानत नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या.