नवी दिल्ली -दिल्ली निवडणूक आयोगाने भाजपला मोठा झटका दिला आहे. नमो टीव्हीवर कोणतेही रेकॉर्डेड कार्यक्रम विना परवानगी चालण्यावर बंदी आणल्यानंतर, आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या (सीईओ) परवानगी शिवाय कोणतेही कार्यक्रम चालवण्यास टीव्हीला मज्जाव करण्यात आला आहे. नमो टीव्हीवर पंतप्रधान मोदी आणि भाजपचा प्रचार करण्याचे आरोप आहेत.
लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. त्यासाठी चक्क नमो टीव्ही नावाचे सॅटेलाईट चॅनलही त्यांनी लॉन्च केले. या चॅनलवर भाजप मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते. मात्र, यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर भारतीय प्रसारण मंत्रालयाला या चॅनलबद्दल विचारले असता त्यांनी हा चॅनल खरेदी-विक्री करणारे असल्याचे म्हटले होते. त्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरणही दिले होते.