नवी दिल्ली -'मला संसदेत भाजपच्या लोकांनी माफी मागायला सांगितली. मात्र, मी मुळीच माफी मागणार नाही. एकवेळ मरण पत्करेन पण कोणाचीही माफी मागणार नाही. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही,' असे म्हणत राहुल गांधींनी त्यांच्या आधीच्या वक्तव्यासाठी माफी मागणार नसल्याचे सांगितले. 'खरे तर नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे. त्यांचे 'असिस्टंट' अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे,' असे ते पुढे म्हणाले. ते रामलीला मैदानावर भारत बचाओ रॅलीमध्ये बोलत होते.
भारत बचाओ रॅलीत राहुल गांधी यांचे भाषण हेही वाचा... 'नागरिकत्व सुधारणा कायद्या सेनेने राज्यात स्वीकारावा, भाजप राजकीय तडजोड करायला तयार'
राहुल गांधींनी केरळमधील वायनाड 'भारत जगाची रेप कॅपिटल' झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी झारखंडमध्ये 'मेक इन इंडिया'ऐवजी 'रेप इन इंडिया' अशी स्थिती झाली असल्याचे म्हटले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्यांचे पडसाद लोकसभेतही उमटले. भाजपच्या सर्वच नेत्यांनी राहुल यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी संसदेत केली होती.
हेही वाचा... पालघरच्या चारोटी येथे 'बर्निंग कार'चा थरार
'राहुल गांधींच्या वक्तव्याने फक्त माझ्यावरच नाही तर संपूर्ण देशावर आघात झाला आहे. त्यांनी संसदेचीच नाही, तर संपूर्ण देशाची माफी मागावी,' असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. सभागृहात गदारोळ सुरू होताच लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
हेही वाचा... B'Day Spl: 'क्लॅपर बॉय' ते 'शो मॅन', 'असे' घडले राज कपूर
काय म्हणाले होते राहुल गांधी-
वायनाडमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी भारत जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी आहे, असे म्हटले होते. तर झारखंडमध्ये त्यांनी भारत 'मेक इन इंडिया' नाही तर रेप इन इंडिया झाला आहे, असे वक्तव्य केले होते. उत्तरप्रदेशात भाजपचा आमदार बलात्कार करतो, त्यानंतर पीडितेचा अपघात होतो. मात्र, मोदी यावर काहीही बोलत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले होते. नरेंद्र मोदी म्हणतात, बेटी बचाओ बेटी पढाओ. मात्र, मोदी हे सांगत नाहीत की, बेटींचा कोणापासून बचाव करायचा आहे. तर देशातील मुलींचा भाजपच्या आमदारांपासून बचाव करायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.