नवी दिल्ली- देशाला हादरवून टाकणाऱ्या मुझफ्फरपूर आश्रयगृह प्रकरणातील १९ आरोपींवरील गुन्हा आज सिद्ध झाला. दिल्लीतील एका न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. यावेळी एका आरोपीला निर्दोष ठरवण्यात आले. याआधी ही सुनावणी १४ जानेवारीला होणार होती, मात्र दिल्ली न्यायालयाने ती पुढे ढकलत आजची तारीख दिली होती. या आरोपींच्या शिक्षेवर आता २८ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
२०१९मध्ये ३० सप्टेंबरलाच अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ कुलश्रेष्ठ यांनी या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. मात्र, १४ नोव्हेंबरला झालेल्या वकीलांच्या संपामुळे हा निर्णय जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर, १२ डिसेंबरला कुलश्रेष्ठ हे सुट्टीवर असल्या कारणाने याबाबतचा निर्णय जाहीर होऊ शकला नव्हता.
२१ आरोपींविरोधात सबळ पुरावे..
सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायालयात सांगितले होते, की पीडित मुलींनी दिलेली माहिती पाहता, २१ आरोपींविरोधात सबळ पुरावे आपल्याकडे आहेत. तर आरोपींकडून असा आरोप करण्यात आला होता, की सीबीआय या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास करत नाही. ही घटना घडल्याची ना कोणती विशिष्ट तारीख आहे, ना वेळ, ना स्थळ, हा सर्व खटला हवेतच सुरू आहे.