मुजफ्फरनगर-उत्तर प्रदेशातील खातौली तहसील अंतर्गत कौटुंबिक कोर्टाने एका महिलेला आपल्या पतीला भत्ता देण्यास सांगितले आहे. संबंधित पती चहा विक्रेता म्हणून काम करतो. सात वर्षांपूर्वी मुजफ्फरनगरच्या कौटुंबिक न्यायालयात त्याने पोटगीचा दावा दाखल केला होता.
30 वर्षांपूर्वी किशोरीलाल सोहुनकरचे कानपूरच्या मुन्नी देवीशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही काळानंतर दोघांमध्ये वाद झाले. हे पती-पत्नी गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. मुन्नी देवी कानपूर येथे भारतीय सैन्यात चतुर्थश्रेणी कर्मचारी होत्या. तर किशोरीलाल आपला उदरनिर्वाह करण्यासाठी चहाचं छोटं दुकान चालवत होते.
दरमहा दोन हजार रुपये देण्याचे आदेश
मुन्नी देवी निवृत्त झाल्या असून त्यांना 12 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. किशोरीलाल चहा विक्रीसाठी खतौली येथेही काम करतात. परंतु गरीबीने त्रस्त झाल्याने त्यांनी सात वर्षांपूर्वी मुजफ्फरनगरच्या कौटुंबिक न्यायालयात भत्ता संदर्भात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने किशोरीलालच्या बाजूने निकाल दिला आहे. कोर्टाने मुन्नी देवी यांनी पतीला दरमहा दोन हजार रुपये देण्याचे आदेश दिलेत. मात्र न्यायालयाच्या या निर्णयावर किशोरीलाल सोहुनकर पूर्णपणे समाधानी नाहीत.