मुस्लीम तरुणाला काढायला लावली पारंपरिक टोपी, 'जय श्रीराम' म्हणण्यास नकार दिल्याने मारहाण
'काही अज्ञात तरुणांनी मला घेरले. माझ्या डोक्यावरील पारंपरिक टोपीवर आक्षेप घेतला. या परिसरात टोपी घालण्याची परवानगी नाही, असे सांगत आरोपींनी मला धमकावले. त्यांना मी नमाज पढून परत येत असल्याचे सांगितले. तर त्यांनी माझी टोपी काढली आणि मला थोबाडीत मारली,' असे आलमने सांगितले.
गुरुग्राम - काही अज्ञात तरुणांनी येथे २५ वर्षीय मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने मुस्लिमांची पारंपरिक टोपी घातली होती. त्याला ती काढण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याला 'जय श्री राम' म्हणण्यासही सांगण्यात आले. त्याने म्हणण्यास नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मोहम्मद बरकत आलम असे तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. गुरुग्राम येथील जकोबपुरा परिसरात तो राहतो.
आलम याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत सदर बाजार परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले. 'काही अज्ञात तरुणांनी मला घेरले. माझ्या डोक्यावरील पारंपरिक टोपीवर आक्षेप घेतला. या परिसरात टोपी घालण्याची परवानगी नाही, असे सांगत आरोपींनी मला धमकावले. त्यांना मी नमाज पढून परत येत असल्याचे सांगितले. तर त्यांनी माझी टोपी काढली आणि मला थोबाडीत मारली. त्यानंतर त्यांनी मला 'भारत माता की जय' अशी घोषणा देण्यासही सांगितले. मी तशी घोषणा दिली. त्यानंतर ते मला 'जय श्री राम' म्हणण्यास सांगू लागले. मी त्याला नकार दिला. त्यानंतर त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.' अशी माहिती आलमने दिली.
आपण मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर आपल्याच समाजातील काही लोक धावत आले. नंतर आरोपींनी पळ काढला, अशी माहिती आलमने दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आलमची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्हीची मदतही घेतली जात आहे.