वॉशिंग्टन- मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असलेला पाकिस्तानी कॅनेडियन दहशतवादी तहव्वुर हुसेन राणा (वय ५८) याला अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. राणाला भारताच्या ताब्यात दिले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राणावर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणाला दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या कारागृहातून सोडण्यात आले होते. यानंतर पुन्हा त्याला अमेरिकेने लॉस एंजेलिसमध्ये अटक केली आहे. भारत सरकार राणाला भारतात आणण्यासाठी, अमेरिकेशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, राणाची तुरुंगवासाची शिक्षा डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण होणार होती. पण त्याआधीच २ दिवासपूर्वी त्याची सुटका झाली होती. मात्र, त्याला पुन्हा अटक करण्यात आऐळी आहे. त्याला भारताच्या ताब्यात देण्या संदर्भातील हालचालींना वेग आला असल्याचे समजते.
तहव्वुर राणा हा शिकागोचा रहिवासी असून त्याला २००९ मध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात कट आखल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. २६/११ ला लष्कर ए तोएबाच्या १० दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ६ अमेरिकी नागरिकांसह १६६ जणांचा जीव गेला होता. त्यावेळी एकूण नऊ दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार मारले. तर अजमल कसाब हा जीवंत पकडला गेला होता. त्याला भारतीय न्यायालयात सुनावणीनंतर फाशीची शिक्षा सुनावून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
अमेरिकी न्यायव्यवस्थेनुसार एका व्यक्तीला एकाच गुन्ह्य़ासाठी दोनदा शिक्षा करता येत नाही. त्यामुळे भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेगळे आरोप ठेवले आहेत. दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय व अनेक शहरांतील छबाड गृहे येथे हल्ल्यांचा कट आखल्याच्या आरोपावरून भारताने त्याचे प्रत्यार्पण मागितले आहे.
राणाला भारतात आणण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून ही प्रकिया किचकट आहे. पण भारतीय विदेश मंत्रालय, गृह मंत्रालय तथा कायदे आणि विधी मंत्रालय आणि अमेरिका विदेश मंत्रालय आणि न्याय मंत्रालय यांच्यात प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात ट्रम्प प्रशासनानेही राणा याला वेळेत भारताच्या ताब्यात देण्यास सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.