भोपाळ - गावातील एखादी सार्वजनिक अडचणी पुरुष मंडळीच सोडवतात, असे बहुतांशी वेळा दिसते. मात्र, छत्तरपूरजवळच्या अंग्रोथा या गावातील २५० महिलांनी हा समज खोटा ठरवला आहे. त्यांनी एकत्र येऊन टेकडी खोदून पाण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे. गेली १८ महिने या महिलांनी हे खोदकाम केले व गावातील पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
नारीशक्ती : पाणीप्रश्न सोडवण्यासाठी खोदली टेकडी! - अंग्रोथा गाव पाणी प्रश्न
मध्य प्रदेशातील एका गावामध्ये पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. या महिलांनी १८ महिने काम करून एक टेकडीच खोदून काढली व गावात पाणी येण्यासाठी कालवा तयार केला.
गावाजवळच्या जंगलात एक झरा आहे. त्याचे पाणी असेच वाहून जाते, त्याचा वापर होत नाही. त्यामुळे गावातील महिलांनी खोदकाम करून या झऱ्याचे पाणी थेट गावात आणण्यासाठी छोटा कालवा तयार केला. या कालव्याच्या मदतीने जंगलातील पाणी गावातील जलाशयात आणले गेले, असे बबिता राजपूत या स्थानिक महिलेने सांगितले.
गावात पाणीटंचाई आहे. पाणी नसल्यामुळे शेतीची कामे तर सोडाच पण दैनंदिन कामे सुद्धा करता येत नव्हती. जनावरांचेही पाण्याअभावी हाल होते. म्हणून आम्ही महिलांनी पुढाकार घेऊन पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, असे विविताबाई आदिवासी यांनी सांगितले.