मुंबई : २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळाली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयामध्ये याबाबत आज सुनावणी पार पडली. या प्रकरणात एकूण सात आरोपींपैकी एक असलेल्या ठाकूर या भाजपच्या खासदारही आहेत. त्या सोमवारी न्यायालयात हजर झाल्या होत्या.
सोमवारच्या सुनावणीनंतर, आज मंगळवारी त्यांनी न्यायालयात पुढील सुनावण्यांना हजर न राहण्याबाबत अर्ज दाखल केला. आपल्या प्रकृतीच्या आणि सुरक्षेच्या कारणांमुळे त्या वारंवार भोपाळ ते महाराष्ट्र असा प्रवास करु शकत नाहीत, असा अर्ज त्यांचे वकील जे. पी. मिश्रा यांनी दाखल केला होता. त्यानंतर विशेष न्यायमूर्ती पी. आर. सित्रे यांच्यासमोर याबाबत सुनावणी पार पडली.
प्रकृती आणि सुरक्षेचे कारण..
"ठाकूर यांना विविध प्रकारचे आजार जडलेले असून, त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी मुंबईमध्ये आल्यानंतरही त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात काही चाचण्या पार पडल्या. यावेळी कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना एकाधिक आजार असल्याचे सांगितले" असे मिश्रा यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. यासोबतच, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. यासाठी मध्य प्रदेश सरकारने त्यांना सहा सुरक्षारक्षकही दिले आहेत. याशिवाय त्यांचे दोन खासगी मदतनीसही आहेत. हा सर्व लवाजमा घेऊन वारंवार भोपाळ ते मुंबई प्रवास करणे शक्य नसल्याचेही या अर्जात म्हटले होते.
न्यायालयाने बोलावल्यास यावे लागेल..