मंदसौर (म.प्र)- अवकाळी पाऊस व दुष्काळ परिस्थितीचा देशातील कांदा निर्मितीवर प्रभाव पडला आहे. बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांदा महाग झाल्याने काहींनी तर जेवणात कांद्याचा उपयोगच करणं बंद केला आहे. आधीच कांद्याची चणचण असताना आता जिल्ह्यातील मंदसौर येथील रिचा या गावातील एका शेतकऱ्याचा कांदा चोरीला गेला आहे.
रिचा येथील शेतकरी जितेंद्र कुमार यांनी आपल्या १.६ एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. त्यांच्या शेतातील कांद्याची वाढ झाली होती व ते त्याला कापन्याच्या तयारीत होते. मात्र, त्या आधीच चोरट्यांनी त्यांच्या शेतातील कांदा लंपास केला. या घटनेनंतर शेतकरी जितेंद्र कुमार यांनी सदर चोरीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरीस गेलेला कांदा हा सुमारे ३०,००० रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. तक्रार दिल्यानंतर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने येऊन घटना स्थळाची पाहणी केली व याप्रकरणी तपास सुरू केला आहे.