भोपाळ- मध्य प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांनी आपला राजीनामा दिला आहे. सर्व मंत्र्यांनी आप-आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला असून, पुन्हा नव्याने मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घरी सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
"मुख्यमंत्र्यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना दिला असून त्यांनी तो स्वीकारला आहे. भाजपने राज्यात तयार केलेल्या या परिस्थितीला लढा देण्यासाठी नवीन मंत्रीमंडळ स्थापन करण्याची मागणी आम्ही त्यांना केली आहे. आमचे सरकार स्थिर असून, पूर्ण पाच वर्षे ते टिकणार आहे." अशी माहिती काँग्रेस नेते पी. सी. शर्मा यांनी दिली आहे.