नवी दिल्ली -'जेव्हा देशात कोरोना पसरत होता तेव्हा तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त होता', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी खासदार डॉ. कोल्हे कोरोना महासंकटावरील चर्चेवर लोकसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, देशात 30 जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, आज 9 महिन्यांनंतर काय परिस्थिती आहे? सरकार स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. मृत्यू दरात घट झाली आहे. यासाठी सरकारचे अभिनंदन करतो. मात्र, या आकडेवारीच्या मागे 90 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले, या वास्तविकतेला आपण अस्विकार करू शकणार नाही. विशेष म्हणजे या 90 हजार मृत्यूंमध्ये अनाथ, लॉकडाऊन काळात रस्त्यावर पायी चालणाऱ्या प्रवासी मजूर, उद्योगधंद्यांचे नुकसान झाल्यामुळे परिवाराने केलेली सामूहिक आत्महत्या अशा मृत्यूंचा समावेश नाही आहे.