नवी दिल्ली - देशभरामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 301 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातीत 12 जणांचा काल (गुरुवार) दिवसभरात मृत्यू झाला तर 336 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील 2 दिवसांत तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित 647 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 14 राज्यांमध्ये या कार्यक्रमाशी संबंधित रुग्ण आढळून आले आहेत. अंदमान निकोबार, आसाम, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश राज्यामध्ये तबलिघी जमात कार्यक्रमाला गेलेले रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे 156 जण पूर्णपणे बरे झाले आहेत.