नवी दिल्ली : देशाचे पहिले चांद्र अभियान, 'चांद्रयान-१'ने चंद्राची काही नवी छायाचित्रे पाठवली आहेत. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरील पृष्ठभाग गंजल्याचे या छायाचित्रांमधून दिसून येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री (अवकाश विभाग) जितेंद्र सिंह यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
इस्रोच्या या चांद्रयानाने पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये हे दिसून येत आहे, की चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरील पृष्ठभाग गंजल्याप्रमाणे झाला आहे. चंद्राच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याची आपल्याला आधीपासून माहिती आहे. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आणि ऑक्सिजन असल्याचे यापूर्वी आढळून आले नाही. विशेष म्हणजे, पाणी आणि ऑक्सिजनशिवाय लोहाला गंज चढू शकत नाही. त्यामुळे छायाचित्रांमध्ये दिसून आलेला प्रकार हा आश्चर्यकारक असल्याचे सिंह म्हणाले.