नवी दिल्ली– राफेलच्या लढाऊ विमान खरेदीतील भ्रष्टाचारावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर नव्याने हल्ला चढविला आहे. सरकारने राफेलच्या खरेदीत भ्रष्टाचार व अपहार केल्याचा राहुल गांधींनी दावा केला आहे.
राफेलची खरेदी करताना सरकारी तिजोरीवर मोदी सरकारने डल्ला मारल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे. सत्य एक आहे, वाटा अनेक आहेत, हा महात्मा गांधींचा सुविचारही गांधींनी ट्विट केला आहे.
दोन आठवड्याभरापूर्वी राफेलची लढाऊ विमाने हे हरियाणामधील हवाईलदलाचे विमानतळ असलेल्या अंबाला येथे पोहोचली आहेत. त्यासाठी राफलेला 7 हजार किमीचे अंतर पार करावे लागले आहे. ही लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाल्याने हवाई दलाचे सामर्थ्य वाढले आहे.
असा आहे खरेदीचा व्यवहार
सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतांना बळकट करण्यासाठी भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमाने ५९,००० कोटींना खरेदी करण्याचा करार केला. भारतीय हवाई दलाने दोन्ही तळावर शेल्टर्स, हँगर्स आणि देखभाल सुविधांच्या विकासासाठी ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी ही अंबाला हवाई दल तळावर तैनात करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचा तळ हा भारत-पाकिस्तान सीमेरेषेपासून २०० किमी अंतरावर आहे. राफेलची दुसरी तुकडी पश्चिम बंगालमध्ये हसिमारा इथे असेल. सर्व ३६ विमानांची डिलिवरी एप्रिल २०२२ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.