नवी दिल्ली -देशामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 184 पेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत केले. येत्या 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून, स्वतःसाठी संचारबंदी लागू करावी. तसेच आपल्या घरासमोर उभे राहून टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त करावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.
देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सरकारची यावर पूर्ण नजर आहे. देशातल्या १३० कोटी नागरिकांनी या जगभरातील साथीचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या निर्देशांचे पालन करावे. तसेच नागिरिकांनी संयम बाळगावा आणि नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नागरिकांनी स्वतःला कोरोना होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच इतरांचेही कोरोनापासून संरक्षण करावे. जर गरजेचे असले तरच घरातून बाहेर पडावे आणि शक्य असतील तेवढी कामे कामे घरातून करावीत, असे मोदी म्हणाले.
रुग्णालयात काम करणाऱ्या व्यक्ती, सरकारी कर्मचारी, प्रसारमाध्यमातील कर्मचाऱ्यांनीच फक्त कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी घराबाहेर पडावे, असेही मोदी म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळावे आणि सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून, स्वतःसाठी संचारबंदी लागू करावी. मी प्रत्येक देशवासियांकडून समर्थन मागत आहे. जनता कर्फ्यू म्हणजे जनतेकडून लागू केलेले जनतेसाठीचा कर्फ्यू. येत्या रविवारी म्हणजे २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान सर्व नागरिकांनी स्वतःहून संचारबंदीचे पालन करावे, असे मोदी म्हणाले.
रविवारी कोणीही घरामधून बाहेर पडू नये. गर्दी करू नये. सर्व राज्य सरकारांनी इतर संघटनांनी संचारबंदी लागू करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे. रविवारी सायकांळी 5 वाजता आपल्या घरासमोर उभे राहून सर्वांनी कोरोना प्रभाव थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार व्यक्त करावे, असे आवाहन मोदींनी केले. तसेच सर्वसामान्य तपासणीसाठी रुग्णालयात जाऊ नये. जर गरज असेल. तर ओळखीच्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून सल्ला घ्यावा, असेही मोदी म्हणाले.
कोरोना विषाणूचा अर्थव्यवस्थेवरही दु्ष्परिणाम होत आहे. या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. तुमच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीचे वेतन कापू नका, असा आग्रह मोदींनी उच्च उत्पन्न गटातील लोकांना केला.
देशात औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता होऊ नये, यासाठी सरकारकडून सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. सर्वसामान्यांनी त्यांची साठेबाजी करू नये, असे मोदी म्हणाले.
गेल्या 2 महिन्यापासून 130 कोटी भारतीयांना कोरोना संकटाचा सामना केला आहे. येत्या काळातही प्रत्येक जण आपल्या कर्तव्याचे पालन करेल, याचा मला विश्वास आहे. सध्या देशासमोर समस्या निर्माण झाली आहे. यामध्ये अफवा आणि खोट्या बातम्या पसरतात, अशा वेळी प्रत्येकाने सतर्क राहायला हवे. काही दिवसांमध्येच नवरात्री उत्सव येत आहे. हे पर्व शक्ती आणि उपासनेचे पर्व आहे. भारत पूर्ण शक्तीने कोरोनाचा सामना करेल आणि पुढे जाईल, असे मोदी भाषणाच्या शेवटी म्हणाले.