महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 23, 2019, 5:52 PM IST

ETV Bharat / bharat

मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीने भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत - निक्की हेले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांनी रविवारी ह्युस्टन येथे 'हाउडी मोदी' कार्यक्रमात 50 हजार निवासी भारतीयांना संबोधित केले. भारत-अमेरिकेत उत्तम भागिदारी राहिली आहे, मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीने ती अधिक मजबूत होत आहे, असे निक्की हेले यांनी यावर म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

निक्की हेले

वॉशिंग्टन- अमेरिकेतील ह्युस्टन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवासी भारतीयांना संबोधित केले. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड्र ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीची प्रचिती आली. भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील माजी राजदूत निक्की हेले यांनी यावरून भारत-अमेरिका संबंधावर भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड्र ट्रम्प यांच्यातील मैत्रीने नवी दिल्ली-वॉशिंग्टनमधील संबंध अधिक दृढ केले असल्याचे निक्की हेले यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांनी रविवारी ह्युस्टन येथे 'हाउडी मोदी' कार्यक्रमात 50 हजार निवासी भारतीयांना संबोधित केले होते. भारत-अमेरिकेत उत्तम भागिदारी राहिली आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीने ती अधिक मजबूत होत आहे, असे निक्की हेले यांनी म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात निवासी भारतीयांनी 'हॉउडी मोदी' असे म्हणत मोदींचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी, 'भारतात सर्व छान चाललं आहे', असे म्हणून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भारताचा खरा मित्र कोणी असेल, तर तो व्हाईट हाऊसमध्येच आहे, असे सांगून मोदींनी दोनही देशांमधील मैत्रीचे संबंध ठळक केले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी 'अबकी बार, ट्रम्प सरकार'चा नारा देऊन उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. जागतिक राजकारणात ट्रम्प यांचे मोठे योगदान असून, त्यांनी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंधांसाठी प्रयत्न केल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.

हेही वाचा-'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे'.. संपूर्ण ह्युस्टन मोदीमय !

मला २०१७ मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घडवली होती. मी आज त्यांना माझ्या कुटुंबाची भेट घडवत असल्याचे म्हणून मोदींनी उपस्थित भारतीयांकडे हात दाखवल्यानंतर नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. तसेच ट्रम्प यांच्या कुटुंबाला भारत दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण यावेळी पंतप्रधानांनी दिले. ह्युस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बेंगळुरू, शिकागोपासून शिमला आणि लॉस एंजल्सपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध आहेत, असे मोदींनी म्हटले.

तर, ट्रम्प यांनीही त्यांच्या भाषणात मोदी अत्यंत चांगले काम करत असल्याचे म्हटले. मोदी यांच्या नेतृत्वात भारत सशक्त होत असून त्यांच्या कार्यकाळात ३० कोटी जनता गरीबीबाहेर आली आहे, असे ट्रम्प म्हणाले. तसेच दोनही देशांची घटना ‘वी द पीपल्स’ने सुरू होत असल्याचा उल्लेख राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला. पुढे बोलताना, सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्र एकमेकांसोबत कार्यरत आहेत. इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच सीमा सुरक्षिततेच्या बाबत दोनही राष्ट्रे सक्षम असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details