नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी १२-१३ जूनच्या शांघाय सहकार्य संस्थेच्या परिषदेला (एससीओ) उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत पंतप्रधान रशिया आणि चीनच्या राष्ट्रध्यक्षांशी द्विपक्षीय बोलणी करणार आहेत. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात कसल्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
शाघांय परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही, असे व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा होणार आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर परिषदेत चर्चा करणार आहेत. ही परिषद १३ ते १४ जून रोजी किरगिस्तानमधील बिशकेक येथे पार पडणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (पश्चिम) सचिव ए. गितेश शर्मा यांनी सांगितले. परिषदेचा सदस्य झाल्यानंतर भारत दुसऱ्यांदा सहभागी होत आहे. तर मोदी हे त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच बहुस्तरीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
किरगिस्तान रिपब्लिककडे अध्यक्षपद असलेल्या एससीओच्या विविध संवाद माध्यमात भारत गेली काही वर्षे सक्रिय सहभाग घेत आहे. या परिषदेत जागतिक सुरक्षेची स्थिती, बहुस्तरीय आर्थिक सहकार्य तसेच आंतरराष्ट्रीय विषयासंह प्रादेशिक विषयावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. मोदी किरगिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सुरोनबे जीनबेकोव यांच्याबरोबरदेखील पंतप्रधान मोदी हे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (पश्चिम) सचिव ए.गितेश शर्मा म्हणाले, दहशतवादाचा आपल्याला आणि इतर देशांना धोका आहे. त्याबाबत आपले विचार आणि अनुभव भारत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यवर्ती आशियातील देशांसह रशियालाही दहशतवादाला धोका भेडसावत असल्याचे त्यांनी म्हटले.