बंगळुरू - महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-२' आज मध्यरात्रीनंतर दीड ते अडीचच्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. 'चांद्रयान-२' ने आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यामुळे आता लँडिंगदेखील नक्कीच सॉफ्ट होईल यात शंका नाही.
देशासह जगभरातील वैज्ञानिक आणि भारतातील सर्व लोक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या सर्वांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील, चांद्रयान-२ च्या लँडिंगसाठी उत्सुक आहेत. चांद्रयान-२ च्या वाटचालीची, तिथल्या घडामोडींची ते क्षणाक्षणाला माहिती घेत आहेत.
मोदींनी ट्विटरवर व्यक्त केली उत्सुकता...
१३० कोटी भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण जवळ आला आहे. काही तासांमध्येच चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. मी बंगळुरूमधील इस्रोच्या कार्यालयात उपस्थित राहून या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. यावेळी, वेगवेगळ्या राज्यांमधील तसेच, भूतानमधील तरुण विद्यार्थीही माझ्यासह उपस्थित असतील.
२२ जुलै रोजी चांद्रयान-२ चे प्रक्षेपण झाले. तेव्हापासून वेळोवेळी मी चांद्रयान-२ च्या प्रगतीबद्दल माहिती घेत आलो आहे. माझ्यासह तुम्हीही या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. चांद्रयान-२ चे लँडिंग पाहतानाचे आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करा, त्यांपैकी काही मी रिट्विट करेल, असे आवाहन मोदींनी ट्विटरवरुन केले आहे.
हेही वाचा : बारामतीची सिध्दी पवार घेणार पंतप्रधानांसोबत चांद्रयान मोहीम पाहण्याचा अनुभव