नवी दिल्ली - काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आर्थिक सल्लागारांच्या ड्रीम टीमने संपूर्ण अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून टाकली आहे. सद्यपरिस्थितीमध्ये मोदींना आणि त्यांच्या अर्थमंत्र्यांना पुढे काय करावे हेही माहिती नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आर्थिक सल्लागारांच्या ड्रीम टीमने संपूर्ण अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून टाकली आहे. पूर्वी भारताचा जीडीपी 7.5 टक्के होता. तर महागाई ही 3.5 टक्के होती. मात्र आता महागाई 7.5 टक्के झाली असून जीडीपी 3.5 टक्के झाला आहे. या परिस्थितीमध्ये पुढे काय करावे, ही त्यांना माहिती नाही', या आशयाचे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे. नव्याने जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१९-२० साली जीडीपी ६.१ टक्क्यांवर राहणार असल्याचे भाकित केले होते. त्याआधी विकास दर ६.९ टक्के राहणार असल्याचे सर्वोच्च बँकेने म्हटले होते. मात्र, नंतर आकडेवारीत बदल केला होता. आता विकास दर ४.५ टक्क्यांवर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकासदर (जीडीपी) ५ टक्के राहिल, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केला आहे.