नवी दिल्ली -गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला राष्ट्रनिर्माणाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. ज्या प्रकारे देशातील प्रत्येक नागरिकाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खुल्या मनाने स्वीकारला. यातून भारताची परंपरा दिसते. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय एक नवीन सकाळ घेऊन आला आहे. देशातील प्रत्येकाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची राष्ट्र निर्मितीची जबाबदारी वाढली असल्याचे मोदी म्हणाले.
आजची तारीख 9 नोव्हेंबर खूप महत्त्वाची आहे. आजच्याच दिवशी बर्लीनमध्ये दोन वेगळ्या गटामधील लोकांनी एकत्र येण्याचा संकल्प केला होता. याचबरोबर आज कर्तारपूर कॉरिडॉर सुरू झाला आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचे योगदान आहे. ही तारीख आपल्या सर्वांना एकत्र येऊन प्रगती करण्याचा संदेश देत आहे, असे मोदींनी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदींनी टि्वट करून देशवासियांना शांती, एकता आणि सद्भावना राखण्याचे आवाहन केले होते. हा निकाल अनेक गोष्टींमुळे महत्त्वाचा असल्याचे मोदींनी म्हणाले. कोणताही वाद सोडवताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन महत्त्वाचे असते. प्रत्येक पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. न्यायमंदिरामध्ये शांततापूर्ण मार्गाने अनेक शतकांपासून चालू असलेल्या वादाचे निराकरण झाले. हा निर्णय नागरिकांमध्ये न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास आणखी मजबूत करणारा आहे, त्यानुसार १३० कोटी भारतीयांना शांती आणि संयमाचे दर्शन घडवावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.