अयोध्या (उत्तर प्रदेश)- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आता राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून अयोध्येत कित्येक वर्षांपासून काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी राम जन्मभूमी न्यास कार्यशाळेकडून दगड कोरण्याचे काम १९९० पासून सुरू करण्यात आले होते, ते शनिवारचा निर्णय येण्याच्या काही दिवस अगोदरपर्यंत सातत्याने चालू होते. या कार्यशाळेकडे मंदिराचा आराखडाही तयार आहे. कार्यशाळेजवळच राम-जानकी मंदिर असून तेथे रामाची पूजा-अर्चा केली जाते.
'या' आराखड्यानुसारच दगड कोरण्यात आलेमंदिरासाठी दगड कोरण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर या दगडांचा उपयोग होणार आहे. कार्यशाळेमध्ये राम मंदिरासाठी भव्य आराखडा तयार असून त्यानुसार दगड कोरण्यात आले आहेत. यासाठीचे दगड राजस्थानमधून आणण्यात आल आहेत. वेगवेगळ्या आकारात या दगडांची रचना आणि कोरीव काम करण्यात आले आहे. हे सर्व काम विश्व हिंदू परिषदेकडून सातत्याने चालू होते. या न्यास कार्यशाळेसाठी मंदिर आंदोलनातील मुख्य मार्गदर्शक परमहंस रामचंद्र दास यांनी जमीन दान दिली होती, असे दगड कोरण्याचे काम पाहत असलेल्या महंत वरुण दास यांनी सांगितले.विश्व हिंदू परिषदेकडून मंदिराचा जो आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यानुसार पहिला मजला जवळपास १८ फुट आणि दुसरा मजला ९ फुट ९ इंच असेल. गेल्या काही वर्षांपासून राजस्थान, मिर्जापूर आणि गुजरातच्या विविध भागातील कारागीर या कार्यशाळेत काम करत असून जवळपास १ लाख घनफुटहून अधिक दगड कोरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
असे असेल प्रस्तावित राम मंदिरप्रस्तावित मंदिराची रुंदी १४० फुट तर उंची १२८ फुटांच्या जवळपास असेल. पहिल्या मजल्यावर चौथरा असेल, यामध्ये मंदिराचे इतर सर्व ब्लॉक रंगमंडल गर्भ गृह म्हणून तयार केले जातील. ज्या ठिकाणी प्रभु रामाची मूर्ती विराजमान असेल त्या गर्भगृहाच्या बरोबर वर १६ फुट ३ इंचाचा एक विशेष प्रकोष्ठ असेल. या प्रकोष्ठावर ६५ फुट ३ इंच उंचीचे शिखर असेल. या मंदिरासाठी जवळपास पावणेदोन लाख घनफुट लाल दगडांचा वापर केला जाईल. त्यातील जवळपास १ लाखाहून अधिक दगडांचे कोरीव काम पूर्ण झाले आहे.
कुंभ मेळाव्यात ठेवण्यात आला होता आराखडाप्रस्तावित राम मंदिराचा आराखडा सर्वात अगोदर १८८९ मध्ये प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळाव्यात सादर करण्यात आला होता. त्यानंतर हा आराखडा मंदिराच्या शिलान्यास स्थळावर ठेवण्यात आला होता.