पणजी - नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या 3 बंडखोर आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. चंद्रकांत कवळेकर, बाबूश मोन्सेरात आणि फिलीप नेरी रॉड्रिग्ज या काँग्रेसच्या आमदारांबरोबर विद्यमान उपसभापती मायकल लोबो यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
गोव्यात काँग्रेस बंडखोरांचा मंत्रिमंडळात समावेश; 'या' आमदारांनी घेतली शपथ या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, गोवा सरकारमधील मंत्री आणि आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे 2017 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे देखील उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्यानंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, आमच्याकडे 27 आमदार आणि एक अपक्ष गोविंद गावडे मिळून 28 इतके संख्याबळ आहे. जे आमच्या सोबत आले आहेत, ते स्वखुशीने आले आहेत. नव्याने शपथ घेतलेल्यांमध्ये कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचे निश्चित झाले आहे. तसेच सोमवारी खातेवाटप जाहीर केले जाईल. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांनी लोकांसाठी काम कराव असे सांवत म्हणाले आहेत.
शपथविधी सोहळ्यापूर्वी सरकारमधून डच्चू देण्यात आलेल्या आणि कालपर्यंत सरकारचा घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये गोवा भाजप नेतृत्व आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्र्यांनी भाष्य करण्याचे टाळले.