मुलांच्या नव्या पिढीला प्रौढ वर्ग सध्या करत असलेल्या चुका़ंची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यांना असह्य तापमानाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे त्यांचे आरोग्य दुर्बल होऊ शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, जगभरात हवामान बदल होत असल्याने विशेषतः भारतात, मुलांच्या एका संपूर्ण पिढीला विपरित परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यात पुढे असेही म्हटले आहे, की अन्न सुरक्षा, रोगांच्या साथी, पूर आणि उष्णतेच्या लाटा हे सर्व जर ज्वलनशील इंधनाचा वापर आणि जागतिक तापमान नियंत्रणात आणले नाही तर वाढू शकतील. आरोग्य आणि हवामान बदल यावरील वार्षिक विश्लेषण करून दिलेल्या लँसेट अहवालाचे हे निष्कर्ष असून यात ४१ प्रमुख निदर्शकांच्या प्रगतीची माहिती घेऊन तो तयार केला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँक यांच्यासह, ३५ इतर संघटनांच्या १२० तज्ञानी या विश्लेषणामध्ये सहभाग घेतला होता.
हवामान बदल विषयक पॅरिस करारात मान्य केल्यानुसार, जागतिक तापमान दोन डिग्री सेल्सिअसने कमी केले नाही तर भावी पिढ्यांना त्याचे दुष्परिणाम नकळत भोगावे लागणार आहेत. आतापर्यंत, हा परिणाम मुले आणि अर्भकांमध्ये दिसत आहे. कार्बन उत्सर्जनाबाबतचे सध्याचे चित्र सुरू राहिल्यास, लहान मुलांची सध्याची पिढी जेव्हा ७१ वर्षांची होईल तेव्हा जागतिक तापमानात ४ डिग्री सेल्सिअस इतकी वाढ झालेली पाहणार आहे. तापमानात वाढ आणि पावसाच्या आकृतीबंधात बदल यामुळे डेंग्यू आणि मलेरिया या रोगांच्या साथी येण्याचे प्रमाण बेसुमार वाढेल. आज, अर्ध्या जागतिक लोकसंख्येला या रोगांशी संपर्क येण्याचा धोका आहे. फुफ्फुसाचे, ह्रदयासंबंधी आणि मज्जातंतूंचे विकार होण्याचा धोका वाढलेला असेल. गेल्या तीन दशकात, मुलांमधील हगवणीच्या आजाराचा कालावधी दुप्पट झाला आहे.