वॉशिंग्टन (अमेरिका) - मुत्ताहिदा कौमी चळवळ (एमक्यूएम) आणि पाकिस्तानच्या इतर अल्पसंख्याक गटांनी रविवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा निषेध केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. आंदोलनकर्ते अमेरिकेच्या विविध भागातून एकत्र आले होते. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचारामुळे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे. हा अत्याचार पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्ते याचा निषेध नोंदविण्यासाठी एकत्र आले होते. ''अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे संरक्षण करा.'' ''पाकिस्तानी सैन्याला आर्थिक मदत करु नका'' अशा आशयाचे फलक त्यांच्या हातात होते.
म्रान खानच्या अमेरिका भेटीचा निषेध
एमक्यूएम कार्यकर्ते रेहान इबादत यांनी इम्रानच्या भेटीवर टीका केली आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती केली आहे की, अमेरिकेने त्यांना कोणतीही मदत करु नये. "आम्ही येथे निषेध करीत आहोत जेणेकरुन अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे इम्रान खान यांना मोहाजिर, पश्तुन्स, सिंध आणि बलूच या भागातील निष्पाप लोकांना मारण्यासाठी पैसे किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी आश्वासने किंवा वचन देणार नाहीत." असेही ते म्हणाले. आणखी एक निषेधार्थी शेंग सिरींग म्हणाले, "अमेरिकेमध्ये राहत असलेल्या गिलगीट बाल्टिस्तानी व्यक्ती म्हणून गिलगीट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानच्या बेकायदेशीर कारवाईचा आणि अत्याचारांचा निषेध करीत आहे."
चीनच्या सहकार्याबद्दल सिरी यांनी जोरदार टीका केली आणि म्हटले, "चीन या भागाचे विकासाच्या नावाखाली शोषण करत आहे. "पाकिस्तानने भारत आणि अफगाणिस्तानातील ट्रान्झिटिंग व्यापारात हस्तक्षेप करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. गिलगिट-बाल्टिस्तानच्या निदर्शकांनी पुढे असेही सांगितले की ट्रम्प-खान बैठक अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्यावर लक्ष केंद्रित करेल, परंतु अफगाणिस्तानचे लोक त्यांच्या देशाचा सार्वभौमत्व गमावतील आणि पाकिस्तानचे संलग्न राज्य बनतील अशी त्यांची चिंता आहे.
"युनायटेड स्टेट्स इम्रान खानशी वाटाघाटी करीत नाही, त्याऐवजी ते पाकिस्तानच्या सैन्याशी बोलत आहेत. कारण इम्रान खान यांना परराष्ट्र धोरणामध्ये काहीच बोलायचे नाही. राज्य विभाग आणि व्हाईट हाऊस यांना हे माहीत असणे आवश्यक आहे की, पाकिस्तान दहशतवादी संघटनांना समर्थन देत आहे. तालिबान हे अफगाणिस्तानचे शासन किंवा त्यांच्या संविधानाचा आदर करणार नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणने आहे.
आणखी एक निदर्शक सुहेल शम्स यांनी सांगितले की, इम्रान खान यांचा दौरा अधिकृत नाही. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि इंटर-सर्व्हिस इंटेलिजेंसचे (आयएसआय) डायरेक्टर जनरल फैज हमीद हे पंतप्रधानांसोबत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधानांसोबत दोन वरिष्ठ जनरल्स आहेत, अशी ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानी सेना आणि दहशतवादी संघटना यांचे संगनमत आहे. हाफिज सईदची अटकही अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळावी यासाठीच झाली आहे, असेही सोहेल यांनी सांगितले.