नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर अनेक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. यातच हरियाणामधील पलवल जिल्ह्यात एक बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर लैेगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
पोटच्या पोरीवर बापाकडून लैगिंक अत्याचार पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपीने आपल्या पोटच्या मुलीवर लैेगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कोठेही वाच्यता न करण्याची तीला धमकी दिली. मात्र, मुलीने त्रासाला कंटाळून अखेर आपल्या आजी-आजोबांना याची माहिती दिली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तथापि, आठ वर्षांपूर्वी 'निर्भया' घटनेने देशाला हादरवले होते. तेव्हा लोकांनी महिला सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. त्यानंतर देशातील अशा घटनांना चाप बसेल, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संचलनालयाने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीने लोकांच्या या अपेक्षा फोल ठरवल्या आहेत.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०१९मध्ये देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या तब्बल चार लाख पाच हजार ८६१ गुन्ह्यांची नोंद झाली. यांपैकी ३२ हजार ३३ घटना बलात्काराच्या होत्या. म्हणजेच, २०१९मध्ये देशात दिवसाला सरासरी ८७ बलात्कारांची नोंद झाली.