शहाजहाँपूर(उत्तर प्रदेश)- सिसैया गावात ऊसाच्या शेतात म्हैस घुसल्यामुळे 15 वर्षीय मुलाला तीन जणांनी मारहाण केली होती. यामुळे त्या मुलाचा मारहाणीत मृत्यू झाला. तीन जणांविरोधात पोलिसांनी 302 कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तिघेही आरोपी फरार झाले आहेत. मुलाच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक शहाजहाँपूर यांच्या कार्यालयासमोर आरोपींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन केले आहे. या आंदोलनात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तनवीर खान सहभागी झाले होते.
म्हैस शेतात घुसल्याच्या रागातून 15 वर्षीय मुलाला मारहाण; रविवारी मुलाचा मृत्यू - उत्तर प्रदेश पोलीस न्यूज
ऊसाच्या शेतात म्हैस घुसल्याने तीन जणांनी 15 वर्षीय कुलदीप यादव या मुलाला शनिवारी मारहाण केली होती. कुलदीप यादव याचा रविवारी मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आरोपींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन केले.
कुलदीप यादव हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. या दरम्यान त्याची म्हैस साधू सिंह आणि धर्मेद्र सिंह यांच्या शेतात गेली. साधू सिंह आणि धर्मेंद्र सिंह यांनी म्हैस पकडली आणि कुलदीप म्हैस देणार नसल्याचे सांगितले. यावरुन कुलदीपचा धर्मेंद्र, त्याचा मुलगा भुपिंदर आणि साधू यांच्याशी वाद झाला. या वादातून तिघाजणांनी कुलदीप याला जोरदार मारहाण केली. यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले.
जखमी कुलदीप यादवला त्याच्या वडिलांनी शहाजहाँपूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना कुलदीपचा रविवारी मृत्यू झाला. ही बातमी समजताच कुलदीपची आई रानी देवी यांची तब्येत बिघडली. पोलीस निरीक्षक जगनरेन पांडे यांनी संशयित आरोपींविरुद्ध 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. निवडणुकीच्या संबधित वादातून खून केला असल्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.