दिल्ली - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या, शाळा-महाविद्यालये आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. लॉकडाऊनच्या काळात घरी थांबलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कौशल्य वाढवणारे अनेक ऑनलाईन कोर्स सुरू केले आहेत. नागरिकांनी रिकाम्यावेळेत या कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केले आहे.
यातील काही कोर्सेसची माहिती खालीलप्रमाणे -
१) स्वयंम (SWAYAM)- हा उपक्रम केंद्र सरकारच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. शैक्षणिक धोरणातील वापरण्याची संधी (Access), समान संधी (Equity) आणि गुणवत्ता(Quality) या तीन मुलभूत तत्वांवर हा आधारलेला आहे. स्वयंमअंतर्गत असलेल्या एनपीटीईएलमध्ये (NPTEL) विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.
२) स्वयंमप्रभा (Swayam Prabha)- हा ३२ डीटीएच वाहिन्यांचा संच असून जी-सॅट उपग्रहाचा वापर करुन यांचे प्रक्षेपण केले जात आहे. या वाहिन्यांच्या माध्यमातून आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रत्येक चार तासांनंतर नवीन माहिती विद्यार्थ्यांना मिळणार असून ती पाच वेळा पुनर्रप्रक्षेपीत होणार आहे. ही शैक्षणिक माहिती एनपीटीईएल, आयआयटी, युजीसी,सीईसी, आयजीएनओडब्लू, एनसीआरटी आणि एनआयओएस या संस्थांकडून पुरवली जात आहे.
३) नॅशनल डिजीटल लायब्ररी (National Digital Library)-
शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात. विषयानुसार लागणारी माहिती आणि पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध आहेत.