श्रीनगर(जम्मू-काश्मीर) - पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यामध्ये त्राल येथे चकमक सुरू होती. गुप्त माहितीच्या आधारावर त्रालच्या चेवा उलर भागात सुरक्षा दलांनी काल शोधमोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने चकमक सुरू झाली. ही चकमक शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होती.
पुलवामात चकमक.. सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान - पुलवामा दक्षिण काश्मीर
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
मारण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवली जात असल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, २५ जूनला बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथेही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. तर, २३ जूनला पुलवामाच्या बांडझू भागात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या चकमकीत एक जवान जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्या जवानाचा मृत्यू झाला.
दरम्यान, सुरक्षा दलांनी दोन दिवसात पुलवामा आणि शोपिया जिल्ह्यात दोन चकमकीत ८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये पुलवामात जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी, तर जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहीद्दीनचे पाच दहशतवादी शोपियामध्ये ठार करण्यात आले.