श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यातील एक दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचा कमांडर तर दुसरा दहशतवादी पाकिस्तानातील असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानातील दहशतवाद्याचे दानीश तर लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या कमांडरचे नाव नसीरुद्दीन लोन असे आहे. गेल्या 18 एप्रिलला सोपारामध्ये तीन आणि 4 मेला हंडवारामध्ये तीन असे एकूण सहा जवान दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात हुतात्मा झाले होते. हे दोन्ही गोळीबार नसीरुद्दीन लोन याने घडवून आणले होते. त्यामुळे दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारून लष्कराने मोठे यश प्राप्त केले आहे. ही माहिती काश्मीर आयजीपी विजय कुमार यांनी दिली आहे.