श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी तसेच शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरवण्यासाठी दहशतवाद्यांनी आपल्या नापाक कारवाया सुरू केल्या आहेत. कुलगाम जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राजमार्गावरील एका शाळेत दहशतवादी हल्ला झाला आहे. यात तीन जवान जखमी झाले असून एक जण हुतात्मा झाला.
जवान सुभानपोरा भागातील शाळेजवळून जात असताना हा हल्ला झाला. यात जवान जखमी झाले. जखमी जवानांना श्रीनगरमधील सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी सैनिकांच्या एका तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात शाळेची इमारती क्षतिग्रस्त झाली.
गेल्या वर्षात 215 दहशतवाद्यांचा खात्मा -
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षात सीआरपीएफने तब्बल 215 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर रियाझ नाईकू याचाही समावेश होता, अशी माहिती सीआरपीएफचे पोलीस महासंचालक ए. पी. माहेश्वरी यांनी दिली. 2020 मध्ये सीआरपीएफने नक्षलग्रस्त भागातील 32 माओवाद्यांना ठार केले. तसेच, 569 माओवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय, 340 नक्षलवादी सीआरपीएफला शरणही आले आहेत. यासोबत, 'कोब्रा' फोर्सेसनी सात माओवाद्यांना ठार केले होते, तर सुमारे 300 आयईडी जप्त केले होते.