गांधीनगर : गुजरातमध्ये अडकलेल्या शेकडो स्थलांतरीत कामगारांनी शुक्रवारी रात्री रस्त्यावर धुडगूस घातला. सूरतच्या लास्काना भागामध्ये हे कामगार आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे प्रवासी वाहतूक ठप्प झाली असून कित्येक स्थलांतरीत मजुरांना आपापल्या राज्यांमध्ये, गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या कितीतरी मजूरांचा रोजगारही बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असेच काही कामगार काल सूरतमध्ये आपल्या मागण्यांसाठी रस्त्यांवर उतरले होते.
कामगारांनी हातगाडी पेटवली.. आपल्या राज्यामध्ये परत जाण्यासाठी सरकारने काही व्यवस्था करावी. तसेच आतापर्यंत न देण्यात आलेली थकबाकीही त्वरीत देण्याची मागणी ते करत होते. यावेळी या कामगारांनी रस्त्यावर धुडगूस घालत, हातगाड्या पेटवून दिल्या. पोलिसांनी यानंतर कारवाई करत काही कामगारांना ताब्यात घेतले. यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी रात्री उशीरा परिस्थिती नियंत्रणात आणली.. गुजरातमध्ये काल दिवसभरात एकूण ११६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३७८वर पोहोचली आहे. तसेच, गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या १९ बळींची नोंद झाली आहे.
हेही वाचा :दिल्लीत परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ड्रोनचा वापर